

BJP State President visits Vanjarwadi for party worker's housewarming ceremony
भूम, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांच्या भूम तालुका दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. तालुक्यातील सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेल्या वंजारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व सोशल मीडिया स्ट्रॅटेजी मेकर अक्षय (अक्की) बर्वे यांच्या नवीन घराच्या वास्तूशांती कार्यक्रमासाठी चव्हाण खास मुंबईहून उपस्थित राहिले.
एका सामान्य कार्यकर्त्याच्या कौटुंबिक कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्षांनी उपस्थिती लावल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. चव्हाण यांच्या भूम आगमनावेळी शहरातील गोलाई चौकात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. १२ जेसीबीच्या माध्यमातून करण्यात आलेले स्वागत, भला मोठा पुष्पहार, हलग्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील प्रमुख चौकांत चव्हाण यांच्या स्वागताचे बॅनरही लावण्यात आले होते. यानंतर चव्हाण यांनी भूम येथील श्री एस अकॅडमीला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील संधींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर वंजारवाडी येथे ग्रामस्थांशी संवाद साधून गावातील विविध प्रश्न व स्थानिक परिस्थितीची माहिती जाणून घेतली. या दौऱ्याबद्दल अक्षय बर्वे यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना, "आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण होता.
रवि दादा आणि सचिन काकांचा विश्वास व प्रेम आयुष्यभर जपेन," असे सांगितले. यावेळी सचिन बाबर, सुजितसिंह ठाकूर, सुरेश कांबळे, नितीन काळे, दत्ता कुलकर्णी यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौऱ्यामुळे भूम तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
रविंद्र चव्हाण यांच्या भूम तालुका दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः एका सामान्य कार्यकर्त्याच्या वास्तूशांतीसाठी घराच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेली उपस्थिती, वंजारवाडीतील ग्रामस्थांशी साधलेला संवाद आणि भूम शहरातील जंगी स्वागत यामुळे या दौऱ्याची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.