

भूम : जनशक्ती शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या दुटप्पी भूमिकेमुळे भूम शहरातील पाणीपुरवठा धोक्यात आला असून येत्या उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो, अशी माहिती नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुरुवारी (दि. 2) भूम नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, गटनेते सुरज गाढवे आणि नगरसेवक अभिजीत शेटे उपस्थित होते. नगराध्यक्षा गाढवे यांनी सांगितले की, नगरपालिकेची निवडणूक होऊन पदभार स्वीकारल्यानंतरही प्रशासनाचा कारभार अद्याप सुरळीत झालेला नाही.
विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र जनशक्ती शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या भूमिकेमुळे या कर्मचाऱ्यांची मुदतवाढ थांबवण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात नियमित पाणीपुरवठा होणे अत्यंत महत्त्वाचे असताना, संबंधित अनुभवी कर्मचाऱ्यांना कामावर न ठेवल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांना या कामाचा अनुभव नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शासनाकडून मंजूर करून आणलेल्या विकासकामांना अडथळा आणला जात असून नवीन कामे मंजूर करण्याचा आग्रह सभागृहात धरला जात आहे. भूम शहरातील विविध कामांची शासनस्तरावर चौकशी करण्यात आली असून त्यामध्ये कोणतीही अनियमितता आढळलेली नाही, असे त्यांनी नमूद केले. शहरासाठी ‘अमृत 2’ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून तिचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तरीदेखील जनशक्ती आघाडीचे नगरसेवक नव्या पाईपलाईनची मागणी करत असल्याची टीका त्यांनी केली.
शासनाकडून एकाच योजनेंतर्गत सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर दुसरी योजना मिळणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व नगरपरिषदांच्या विद्युत कामांसाठी शासनाने एका कंपनीची नियुक्ती केली असून, त्या निर्णयालाही संबंधित नगरसेवकांकडून विरोध केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वच्छतेचे काम सुरळीत
स्वच्छता कर्मचाऱ्यांची मुदतवाढ केल्यामुळे सध्या शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत सुरू आहे. अन्यथा शहरात अस्वच्छतेचे प्रमाण वाढले असते, असेही त्यांनी सांगितले. तसेच शहरातील जलतरण तलावाचे काम अद्याप अपूर्ण असल्याची माहितीही त्यांनी दिली.