

भूम : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत भूम येथे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मतदार याद्यांमधील कथित अनियमितता, पात्र मतदारांची नावे वगळणे आणि अपात्र व्यक्तींची नावे समाविष्ट करण्याच्या प्रकारांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले.
लोकशाहीत मतदार यादी हा निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र, मतदार यादीतील कथित फेरबदलांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील मतदार यादीतील बदलांची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.
मतदार यादीतील फेरबदलांची स्वतंत्र चौकशी करावी, नावे वगळणे व नवीन नावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेची पारदर्शक पडताळणी करावी, पात्र नागरिकांचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवावा, प्राप्त तक्रारींची वस्तुनिष्ठ चौकशी करावी आणि आगामी निवडणुकांमध्ये पारदर्शकतेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन वरिष्ठ प्राधिकरणाकडे पाठविण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. यावेळी विलास शाळू, ॲड. सिराज मोगल, रुपेश शेंडगे, ॲड. मुशरफ सय्यद, समीयोद्दीन काझी, मोईज सय्यद, दत्ता तांबे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.