

वाशी : दसमेगाव ते वाशी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या खडीमुळे अरुंद झालेल्या रस्त्यावरून प्रवास करताना विद्यार्थी आणि वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती. यासंदर्भात ‘पुढारी’ने ७ ऑक्टोबर रोजी ‘खडी रस्त्यावर, विद्यार्थ्यांसह वाहनधारकांची कसरत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत बांधकाम विभागाने अखेर हालचाली सुरू केल्या असून, संबंधित ठेकेदाराला रस्त्याचे काम सुरू करण्यास भाग पाडले आहे.
दसमेगाव ते वाशी रस्त्याच्या कामासाठी आणलेली खडी महिनाभरापासून रस्त्याच्या कडेला पडून होती. ती न पसरवल्याने रस्ता अरुंद झाला होता. परिणामी, या मार्गावरून जाणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.
खडीवरून वाहने घसरून किरकोळ अपघातही घडले होते. या समस्येकडे दै. ‘पुढारी’ने लक्ष वेधल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला तंबी देत शुक्रवारी (दि. २८) काम सुरू करण्यास भाग पाडले.
त्यानुसार यंत्रसामग्री आणि कामगारांच्या मदतीने रस्त्यावरील खडी पसरवून मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ‘पुढारी’च्या वृत्तामुळे प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. उर्वरित कामही तातडीने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.