

Attack on the police in the police station itself
भूम, पुढारी वृत्तसेवा : एका तरुणाने तलवार घेऊन थेट पोलिस ठाण्यात घुसून मोठा गोंधळ घातला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिस ठाण्यातच पोलिस सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यात एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.
शुभम संजय भोसले (वय २३, रा. कसबा) या तरुणाने हातात तलवार घेऊन पोलिस ठाण्यात प्रवेश केला. यावेळी त्याने पोलिस हरामखोर आहेत अशी शिवीगाळ करत एका पोलिस अंमलदारावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंमलदाराने प्रसंगावधान राखत हा हल्ला चुकवला. त्यांच्या सोबत असलेले पोलिस अंमलदार दत्ता शिंदे यांना मात्र तलवारीचा फटका लागून ते जखमी झाले. या घटनेनंतरही आरोपी थांबला नाही.
त्याने थेट पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये घुसून टेबलावरील काचेवर तलवारीने वार केले, ज्यामुळे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच, त्याने हेडकॉन्स्टेबल कवडे आणि शिंदे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या गंभीर घटनेनंतर शुभम भोसले याच्यावर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार गणेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक बंदखडके करत आहेत. या घटनेमुळे भूम तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या कार्यालयातच हा प्रकार घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.