

रहीम शेख
धाराशिव : संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि समाजाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील नळदुर्ग येथील बसस्थानकावर एका मौलवीने भर गर्दीत, महिला आणि शाळकरी मुलींसमोर मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ लावून अश्लील हावभाव केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मौलवीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नळदुर्ग येथील बसस्थानक नेहमीप्रमाणे प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेले होते. यामध्ये अनेक महिला, महाविद्यालयीन तरुणी आणि शाळकरी मुलींचाही समावेश होता. याच गर्दीत बसलेला कासीम अब्दुल रहीम इनामदार नावाचा मौलवी आपल्या मोबाईलवर मोठ्या आवाजात पॉर्न व्हिडिओ पाहत होता. केवळ व्हिडिओ पाहूनच तो थांबला नाही, तर समोर उभ्या असलेल्या महिला आणि मुलींकडे पाहून तो अश्लील हावभाव देखील करत होता. त्याचा हा किळसवाणा प्रकार पाहून उपस्थित महिला आणि मुलींना प्रचंड मानसिक धक्का बसला. अनेकींनी लाजेने आणि संतापाने माना खाली घातल्या.
या विकृत प्रकारावेळी बसस्थानकावर उपस्थित असलेल्या एका जागरूक नागरिकाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य घडल्याचे पाहून नेटकऱ्यांनी आणि नागरिकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल माणिकराव गव्हाणे यांनी नळदुर्ग पोलिसांत धाव घेतली आणि आरोपी कासीम इनामदार विरोधात फिर्याद दाखल केली. घटनेचे गांभीर्य आणि सार्वजनिक रोष लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी कासीम अब्दुल रहीम इनामदार याच्या विरोधात भारतीय न्याय संहीता 2023 च्या कलम 294(1), 294(2) व 296 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या विकृतीला कायद्याने कठोर शासन व्हावे, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.