Abijit Dipake : प्रथमेशच्या मृत्यूला शासनाची धोरणे जबाबदार, अभिजीत दिपके यांचा आरोप!

न्यायासाठी आंदोलनाचा इशारा, कुटूंबियांची घेतली भेट
खासापुरी (जि. धाराशिव) : प्रथमेश देशमुख याच्या कुटुंबियांचे सांत्‍वन करताना अभिजित दीपके. 
खासापुरी (जि. धाराशिव) : प्रथमेश देशमुख याच्या कुटुंबियांचे सांत्‍वन करताना अभिजित दीपके. 
Published on
Updated on

परंडा, पुढारी वृत्तसेवा : पुणे येथे एमपीएससीची तयारी करणाऱ्या खासापुरी (जि. धाराशिव) येथील प्रथमेश देशमुख यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सीजीपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी गुरुवारी (दि. १०) खासापुरी येथे प्रथमेश यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि स्पर्धा परीक्षेतील अनिश्चिततेच्या कोंडीत प्रथमेशसारख्या तरुणाचा बळी गेला असून, या परिस्थितीला शासनाची धोरणे जबाबदार असल्याचा आरोप दिपके यांनी केला.

प्रथमेश उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत होता. त्यासाठी त्याने पुण्यात राहून एमपीएससीची तयारी केली. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर आर्थिक अडचणी, शेतीची बिकट अवस्था आणि स्पर्धा परीक्षेतील अनिश्चितता असे अनेक प्रश्न उभे आहेत. याच परिस्थितीचा प्रथमेशच्या आयुष्यावर परिणाम झाल्याचे दिपके यांनी सांगितले. “प्रथमेश लाल दिव्याच्या गाडीतून येणार होता; मात्र तो ॲम्बुलन्समधून आला, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे.

ही परिस्थिती शासनाच्या अपयशाचे प्रतीक आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया दिपके यांनी व्यक्त केली. एमपीएससीची तयारी करणाऱ्या युवकांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये. सरकारला तुमची गरज नसली तरी तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

परंडा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वातावरणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणे कठीण होत आहे. शासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून विद्यार्थ्यांना आधार देण्याची गरज असल्याचे दिपके यांनी सांगितले. प्रथमेशच्या कुटुंबाला न्याय आणि योग्य मदत मिळावी, यासाठी आंदोलन उभारण्याचा इशारा दिपके यांनी दिला. शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कुटुंबाला आधार द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news