

A 'Gudhi' of Smart Meters Erected at Mahavitaran's Doorstep
कळंब, पुढारी वृत्तसेवा दहावी बोर्ड परीक्षा सुरू असतानाच महावितरण कंपनीने कळंब शहरासह तालुक्यातील सुमारे ४५०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी महावितरणच्या कार्यालयासमोर "स्मार्ट मीटरची गुढी" उभारून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
यापूर्वीही मुळे यांनी होळीच्या दिवशी वीज बिलांची होळी करत आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांनी महावितरणकडे तक्रार अर्ज दाखल करून काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. कळंब शहरातील एकूण घरगुती वीज ग्राहकांची संख्या किती, त्यापैकी किती ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात आले, तसेच स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी संबंधित ग्राहकांची पूर्व परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत त्यांनी खुलासा मागितला होता.
तसेच स्मार्ट मीटरधारक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी थकबाकीबाबत कोणती सूचना देण्यात आली होती का, आणि "ऑटो डिस्कनेक्ट" प्रणालीद्वारे वीजपुरवठा बंद होणार असल्याची माहिती ग्राहकांना देण्यात आली होती का, याचाही लेखी खुलासा करण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र, या सर्व प्रश्नांवर महावितरणकडून कोणताही स्पष्ट खुलासा करण्यात आला नसल्याचा आरोप करत मुळे यांनी हे आंदोलन छेडले. "ग्राहकांची पिळवणूक करून आर्थिक लूट सुरू आहे," असा आरोप करत त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशीच स्मार्ट मीटरची गुढी उभारून प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनामुळे कळंब शहरात स्मार्ट मीटर, वीजपुरवठा खंडित होणे आणि महावितरणच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, नागरिकांकडूनही याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करण्याची मागणी होत आहे.