

Mahavitaran faces challenge in recovering outstanding electricity bills worth Rs 134 crore
जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील १ लाख १६ हजार २२५ वीज ग्राहकांकडे १३४ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणच्यावतीने थकीत वीज बिल वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यात मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर महावितरणने थकीत विज बिल वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील १ लाख १६ हजार २२५ वीज ग्राहकांकडे १३४ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. थकीत वीज बिलाची रक्कम वसुल करण्यासाठी महावितरणच्यावतीने पथके तयार करण्यात आली आहेत.
थकबाकीदार ग्राहकांना सुरुवातीस वीज बिल भरण्यासाठी सूचना दिल्यानंतर दिलेल्या मुदतीत बिल न भरल्यास अशा ग्राहकांची वीज खंडित करण्यात येत आहे. जानेवारीपासून आजपर्यंत २२ हजार ५४१ ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणच्यावतीने बंद करण्यात आला आहे. मार्चपर्यंत थकीत असलेल्या १३४ कोटी रुपयांच्या वीज बिलापैकी जास्तीत जास्त रक्कम वसूल करण्याचे उद्दिष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यांनी इतर ठिकाणाहून विना परवानगी वीज पुरवठा घेतल्यास कारवाई केली जात आहे.
जिल्ह्यात महावितरणच्या थकबाकीचा आकडा वाढत असल्याने वरिष्ठ पातळीवरून वसुलीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे. वीज बिलाची थकबाकी कमी करण्यासाठी महावितरणच्यावतीने विविध पर्यायही पुढे करण्यात येत आहेत. ज्या वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत त्यांचे वीज बिल थकल्यास थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा रिमोटव्दारे ऑटो डिस्कनेकट केला जात आहे.
जिल्ह्यात २३ फेब्रुवारीपासून स्मार्ट मीटर बसविलेल्या २ हजार ८०७ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा थकीत बिलासाठी ऑटो डिस्कनेक्ट करण्यात आला होता. त्यापैकी सातशेच्यावर ग्राहकांनी तातडीने थकीत बिल भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
मार्च एण्डपर्यंत वसूलीसाठी प्रयत्न
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासूनच महावितरणने वीज बिल वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. मार्च एण्डपर्यंत जास्तीत जास्त रक्कम वसुलीसाठी अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.