शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी | पुढारी

शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : शिवराज राक्षे या पैलवानाने येथील 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर स्वतःचे नाव कोरले. महाराष्ट्र केसरी किताबाचा राक्षे दुसऱ्यांदा मानकरी ठरला. यावेळी कुस्ती प्रेमींची गर्दी उसळली होती. शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर या दोघात महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत झाली. अत्यंत कडव्या आणि अटीतटीच्या लढतीत राक्षे याने सादगीरला धुळ चारत मानाची गदा पटकावली

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव येथे 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील व मुख्य कार्यवाहक अभिराम पाटील व मान्यवरांच्या हस्ते नांदेडचा शिवराज राक्षे याला ६५ वा महाराष्ट्र केसरी किताब, महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आणि मोहोळ घरण्याकडून परंपरेने चालत आलेले चांदीची गदा बहाल करण्यात आली. तर उपमहाराष्ट्र केसरी मल्ल नाशिकचा हर्षवर्धन सदगीर याला मान्यवरांच्या हस्ते महिंद्रा 575 DI व लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ या वर्षीपासून सुरू करण्यात आलेली चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले.

अटीतटीच्या लढतीकडे अख्या महाराष्ट्रातील कुस्ती प्रेमींचे लक्ष लागले होते. शेवटच्या अंतिम लढतीत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध नाशिकचा हर्षवर्धन सदगीर या मल्लात झालेल्या मॅटवरील कुस्तीत 6-0 गुणांनी नांदेडचा मल्ल राक्षे या याने प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावावर केला. धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियमच्या गुरुवर्य के टी पाटील क्रीडा नगरी येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मान्यवर यांच्या हस्ते यावेळी विजेत्या मल्लांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

हेही वाचलंत का?

Back to top button