तानाजी माटे : लोहारा
माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला असून धरणाचे चार दरवाजे दहा सेंटीमीटर उंचीने उघडले आहेत. त्यामुळे तेरणा नदी पात्रात ४३.३२८ घमी/सेकंदाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धाराशिव व लातूर जिल्ह्यांसाठी महत्वाचे असणारे निम्न तेरणा प्रकल्पात गेल्या पंधरा दिवसापासून पाण्याची आवक वाढली आहे.तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत होती. यावर्षी सुरुवातीपासूनच धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे निम्न तेरणा धरण १००% भरले आहे. त्यामुळे निम्न तेरणा प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. पाण्याचा ओघ झपाट्याने वाढत असल्याने मंगळवारी (दि.२४) सायंकाळी ५:३० वाजता दरवाजे क्रमांक १, १४, ७, ८ हे चार दरवाजे दहा सेंटिमीटरने उघडण्यात आले.
निम्न तेरणा धरणात पाण्याचा विसर्ग चालू असल्याने तहसीदार काशिनाथ पाटील यांनी धरणावर येऊन पाहणी केली. यावेळी निम्न तेरणा धरणाचे शाखा अभियंता के, आर, एनगे , हे सर्व कर्मचारी निम्न तेरणा धरणावर तळ ठोकून आहेत. लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चित्रे यांनी चोख बंदोबस्त लावला आहे. राजेगांव,रेबेचिंचोली पोलीस पाटील प्रदीप पाटील,एकोंडी पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, तलाठी,मंडळ अधिकारी पुर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
तेरणा नदीकाठच्या गावांना महसूल मंडळाच्या वतीने गावात दवंडी देऊन तेरणा नदीकाठच्या शेतकरी, रहीवासी यांना सतर्क रहावे व खबरदारी घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे. मंगळवारी धरण क्षेत्रात पावसाला पुन्हा सुरूवात झाल्याने पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.