

'Our trees, your conservation!' Nature-loving group to launch campaign
शंकर बिराजदार
उमरगा : शहरात पर्यावरणाचा समतोल राखता यावा, यासाठी निसर्ग प्रेमी ग्रुपच्या युवकांची एक वर्षापासून धडपड सुरू आहे. ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत १ हजार ६०० वृक्ष लागवड करून १ हजार ५०० झाडे जिवंत ठेवले आहेत. तर यावर्षात २ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्टासह 'वृक्ष आमचे, संवर्धन तुमचे' मोहीम राबविणार असल्याचे सांगून यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे.
शहरात गेल्या वर्षभरात रुग्णावर उपचार करणारे खाजगी वैद्यकीय अधिकारी तसेच वकील, व्यापारी, उद्योजक, पोलिस, सामाजिक या विविध क्षेत्रातील १०२ सदस्य पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य निसर्ग प्रेमी ग्रुप करीत आहे. यात २० महिलांचा समावेश आहे.
या सामाजिक कार्यात नागरिकांचाही सहभाग वाढावा, स्वतः रोपटे लावण्यासाठी तयार व्हावे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही या उदात्त कार्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या ग्रुपची सुरुवात २०२४ मध्ये करण्यात आली. याच्या माध्यमातून दररोज ३० हून अधिक तरुण वृक्ष लावण्याचे काम करीत आहेत.
इतकेच नव्हे, तर नियमीतपणे झाडांची काळजी घेत असून लावलेली रोपटी जिवंत आहेत की नाहीत, याची पाहणी करतात. विशेष म्हणजे, आतापर्यंत एक हजार सहाशे वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यापैकी १ हजार ५०० वृक्ष जगविले आहेत. त्यांचे संवर्धन केले जात आहे. या कार्यात वनविभाग, सामाजिक संस्था, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक वनीकरणाचे सहकार्य मिळाले असल्याचे डॉ लक्ष्मण सातपुते यांनी सांगितले.
वाढती लोकसंख्या आणि विकासाच्या नावाखाली वर्षानुवर्षे जुनी झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. तेव्हा यावर्षी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा ग्रुपचा प्रयत्न आहे. याचा अचलबेट देवस्थान येथून प्रारंभ करण्यात येणार आहे. याकरिता नागरिकांनी खुल्या जागा उपलब्ध करून दिल्यास ग्रुपच्या वतीने वृक्ष लागवड केली जाईल. त्याचे संवर्धन नागरिकांनी करायचे आहे. 'वृक्ष आमचे, संवर्धन तुमचे' ही मोहीम राबवून जास्तीत जास्त वृक्ष लागवड ग्रुपचे उद्दिष्ट आहे असे निसर्गप्रेमी ग्रुपचे सदस्य महेश कवठे यांनी सांगितले.
वसुंधरेवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजी पूर्वक वापर तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन, मानव निर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालण्यासाठी हा प्रयत्न आहे असे निसर्गप्रेमी ग्रुपचे सदस्य श्रीकांत भराटे यांनी सांगितले.