

Youth stabbed to death over old dispute, two arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जुन्या वादातून दोघांनी एका २७ वर्षीय तरुणास भर रस्त्यात भोसकले. यात चाकूचा घाव वर्मी लागल्याने तरुणाने जागीच प्राण सोडले. ही घटना ऐन दिवाळीच्या सणासुदीत मुकुंदवाडी परिसरात सोमवारी (दि.२०) मध्यरात्री घडली. विपुल मधुकर चाबुकस्वार (रा. तोरणगडनगर, सिडको) असे मृत तरुणाचे नाव आहे. तरआशिष गौतम चौथमल (रा. मुकुंदवाडी) सुबोध भास्कर देहाडे (रा मुकुंदवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
विपुलने परिसरात फटाका विक्रीचे दुकान सुरू केले होते. विपुल आणि त्याचा मित्र अजय वाघ यांनी सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फटाक्याचे दुकान बंद केले व जवळच गप्पा मारत बसले. रात्री दीडच्या सुमारास सिगारेट पिण्यासाठी ते मुकुंदवाडीकडे निघाले असता, त्यांना रामनगर कमानीजवळ एका रिक्षात त्यांचा मित्र कुणाल व वैभव बसलेले चौथमलसह दुचाकीवरून तेथे पोहोचला. तेथेच जुन्या वादातून भांडण सुरू झाले.
सुबोध आणि आशिष सोबत विपुलची वादावादी वाढत गेली. यातच आशिषने चाकूने विपुलच्या छातीवर वार केला. घाव वर्मी बसल्याने विपुल रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. त्याला त्याच्या मित्रांनी तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी विपुलची बहिण श्रध्दा मधुकर चाबुकस्वार यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे व त्यांचे पथकांनी घटनास्थळ गाठले. तपासाची सूत्रे हलवत या प्रकरणी सुबोध आणि आशिषला अटक केली. त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, २५ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रवानगी करण्यात आली आहे.