

Rain hits market on Lakshmi Puja day
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आधीच अतिवृष्टीमुळे मराठवाडा संकटाच्या खाईत सापडलेला आहे. त्यातच ऐन दिवाळीच्या दिवशीच मंगळवारी (दि.२१) झालेल्या पावसाचा बाजारपेठेला चांगलाच फटका बसला. खरेदीसाठी बाजारात तोबा गर्दी असतानाच सायंकाळी ५ वाजेनंतर पावसाचा जोर वाढला. यामुळे अचानक वातावरण बदलून उत्साहावर पाणी फिरले. व्यापाऱ्यांची हिरमोड आणि ग्राहकांची गैरसोय झाली. तर हारफुले, पणती, बोळखे, बत्तासे, केरसूनी असे विविध साहित्य विक्रेत्यांचे हाल झाले. पावसापासून माल वाचवताना त्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याचा परिणाम नवरात्र दसऱ्याला बाजारपेठेवरही झाला होता. त्यामुळे व्यापारीवर्गही हवालदिल झाला होता. तरीही दिवाळीत चांगल्या व्यवसायाची आशा होती. त्यातच शासनाकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली आणि कामगारांना बोनस मिळाल्याने व्यवसायात उभारी होऊन दिवाळी माहोल तयार झाला होता.
दिवाळीच्या आदल्या दिवशी सोमवारी रात्री उशिरापर्यंत बाजारात तोबा गर्दी असल्याने कोट्यवधींची उलाढाल झाली. मंगळवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शहरातील विविध भागांत लहान-मोठे विक्रेत्यांकडे विविध वस्तू खरेदीसाठी गर्दी होती. त्यातच दुपारी अनेक भागांत रिमझिम पाऊस बरसला. सायंकाळी ५ वाजता मात्र, जोरदार पाऊस सुरू झाल्याने बाजारपेठांमध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर दुकाने मांडलेल्या बोळखे, पणती, देवीच्या मूर्ती, बत्तासे, केरसुनी असे विविध लहान साहित्य विक्रेत्यांचे मोठे हाल झाले. पावसात माल भिजू नये, म्हणून या विक्रेत्यांची तारांबळ उडत होती. तरीही अनेकांचा माल भिजल्याने आणि व्यवसायावर पाणी फिरल्याने विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले.
फटाके फोडणाऱ्यांचा हिरमोड
फटाका मार्केटमध्ये पावसामुळे व्यापाऱ्यांची दमछाक झाली. जोरदार पावसामुळे फटाका मार्केटमधील रस्त्यावर पाणी वाहत होते. दुसरीकडे सायंकाळी पूजनानंतर फटाके उडवणाऱ्यांचा पावसामुळे हिरमोड झाला. फटाके फोडण्यासाठी पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करावी लागली.
लहान नुकसान विक्रेत्यांचे मोठे
दिवाळीनिमित्त बहुतांश जणांची खरेदी कालच झाली आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आलेल्या पावसाचा मोठ्या व्यावसायिकांवर फारसा परिणाम नाही. मात्र, रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्रीची दुकाने मांडलेल्या लहान विक्रेत्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले. लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष, व्यापारी महासंघ.