

Youth Ends Life In Bidkin Sambhajinagar
बिडकीन : सासुरवाडीच्या शिवारालगत रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन एका ३० वर्षीय तरुणाने जीवन संपविल्याची घटना सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान सोमपुरी येथे घडली. श्रीकांत साहेबराव रंधवे (वय ३०, रा. शेंदुरवादा, ता. गंगापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
श्रीकांत रंधवे हे तोंडोळी येथील रहिवासी असून, त्यांचे वास्तव्य शेंदुरवादा येथे होते. सोमपुरी येथे ज्या ठिकाणी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, त्या ठिकाणापासून जवळच त्यांच्या पत्नीचे माहेर आहे. घटनेच्या वेळी त्यांची पत्नी माहेरी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांनी टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिजुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटने मागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.