Accident News : एसटी बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

आईची भेट ठरली अखेरची, तांबूळगोटा फाट्यावर अंगावर काटा आणणारा अपघात
Accident News
Accident News : एसटी बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यूfile photo
Published on
Updated on

Youth dies in ST bus-two-wheeler accident

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा आईची भेट घेऊन शिर्डीकडे निघालेल्या ३२ वर्षीय तरुणाचा तांबूळगोटा फाट्यावर मृत्यू झाला. वैजापूर-गंगापूर मार्गावर शनिवारी (दि. ११) दुपारी लासलगाव आगाराच्या एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर झालेली धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या प्रचंड तीव्रतेमुळे मृताच्या शरीराचे शीर आणि धड वेगळे होऊन रस्त्यालगतच्या शेतात फेकल्या गेले, तर दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या विदारक घटनेने परिसर हादरून गेला.

Accident News
Kej Crime : केज खूनप्रकरण तापले; अंत्यसंस्कार रोखून कुटुंबीयांचा ठिय्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूरच्या दिशेने येणारी लासलगाव आगाराची एसटी बस (एमएच १४ एलएक्स ७४३५) आणि वैजापूरच्या दिशेने जाणाऱ्या विनाक्रमांक दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात भांड्या ऊर्फ भांडेकर डाबर चव्हाण (३२, रा. म्हारोळा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. रा. शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य होते. मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक असल्याने सुरुवातीला त्याची ओळख पटू शकली नव्हती. अखेर दुचाकीच्या चेसिस क्रमांकाच्या आधारे रात्री सुमारे ९.३० ते १० वाजेदरम्यान मृताची ओळख निश्चित झाली.

माहितीनुसार, भांड्या चव्हाण हे आईला भेटण्यासाठी मूळ गावी म्हारोळा येथे आले होते. आईची भेट घेऊन शिर्डीतील आपल्या घरी परतत असतानाच तांबूळगोटा फाट्याजवळ नियतीने त्यांची वाट अडवली.

Accident News
Sambhajinagar Crime : जन्मदाताच झाला वैरी; पाच वर्षाच्या गतिमंद चिमुकल्याची हत्या

माहिती मिळताच गंगापूर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृताच्या पश्चात आई, दोन बहिणी, पत्नी व मुले असा परिवार आहे. या प्रकरणाची नोंद गंगापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अमित पाटील करीत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news