

Young man murdered and body dumped within the jurisdiction of the City Police Station
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : एका पस्तीस वर्षीय अज्ञात तरुणाचा खून करून मृतदेह सिल्लोड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोकरदन रस्त्यावरील नगरपरिषदच्या पाण्याची टाकीच्या संरक्षक भिंतीजवळ आणून टाकला. ही घटना बुधवारी (दि.२९) दुपारी उघडकीस आली. या तरुणाच्या खुनाच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
एका व्यक्तीने ११२ नंबरवर कॉल करून सिल्लोड-भोकरदन रस्त्यावरील नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीच्या संरक्षक भिंतीजवळ मृतदेह पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच शहर पोलिसांनी धाव घेत पाहणी केली असता एक ३०-३५ वर्षे वयोगटातील अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला.
तरुणाच्या गळा धारदार शस्त्राने चिरलेला असल्याचे दिसून आले. तर घटनास्थळी एक कटर मिळून आल्याने खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणला. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते.
दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजीत काईगडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, सहायक पोलिस निरीक्षक भिंगारे यांनी भेट देत खातरजमा केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भिंगारे करीत आहेत.
आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान
या घटनेतील मृत अज्ञात तरुणाची ओळख व खून करणाऱ्या आरोपींना पकडण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे. तर अज्ञात व्यक्तीचा खून कुणी व का केला ? हे मृताची ओळख व आरोपींना पकडण्यानंतर कळणार असून, पोलिस तांत्रिक बाबींचा तपास करीत आहे. मृताच्या उजव्या हातावर ऐके (AK) असे गोंदलेले आहे. पोलिस मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न करीत असून, सदर तरुणाबाबत माहिती असल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.