

Working women hostel approved in Chikalthana, Nakshatrawadi
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : केंद्राच्या योजनेतून शहरात चिकलठाणा आणि नक्षत्रवाडी भागात लवकरच वर्किंग वुमनसाठी दोन हॉस्टेल बांधण्यात येणार आहेत. या कामाला शासनाने मंजुरी दिली असून महापालिकेने निविदा प्रक्रिया करून कार्यारंभ आदेशही दिले होते. या दोन्ही हॉस्टेलमध्ये किमान २४० महिला राहतील, एवढी क्षमता असेल, असे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.
केंद्र सरकारने वर्किंग वुमेनसाठी प्रत्येक शहरात निवासाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी महापालिकेनेही चार जागांसाठी प्रस्ताव सादर केला होता. यात नक्षत्रवाडी, चिकलठाणा, कोटला कॉलनी आणि सेव्हन हिल या चार ठिकाणच्या जागांचा समावेश करण्यात आला होता. राज्य शासनाकडे महापालिकेने पाठवलेल्या या प्रस्तावाला मंजुरी देत हॉस्टेलच्या बांधकामासाठी ४६ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे. शासनाने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली आहे.
या प्रक्रियेबाबत माहिती देताना प्रशासक जी. श्रीकांत महणाले की, नक्षत्रवाडी आणि चिकलठाणा येथील जागांसाठी मंजुरी मिळाल्याने या भागात वर्किंग वुमनसाठी हॉस्टेल बांधण्यासचे काम महापालिकेने सुरू केले आहे. त्यानुसार संबंधित कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिला आहे. या दोन हॉस्टेलमध्ये प्रत्येकी १२० या प्रमाणेच २४० महिलांच्या निवासाची क्षमता राहणार आहे. हॉस्टेलमध्ये अद्ययावत पद्धतीच्या सुविधा उपलब्ध राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दोन जागांना स्थगिती
महापालिकेने वर्किंग वुमनसाठी चार हॉस्टेल बांधण्यासाठी प्रस्ताव शासनाला सादर केला होता. परंतु, शासनाने यातील कोटला कॉलनी आणि सेव्हन हिल या दोन ठिकाणी हॉस्टेल बांधण्याचा प्रस्ताव स्थगित केला आहे.