

Woman's jewellery stolen, saying she would give gifts to the poor
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तुम्ही गरीब आहात का? माझे साहेब तुम्हाला काहीतरी वस्तू देणार आहेत, अशी बतावणी करत केळी देण्याचा बहाणा करत एका भामट्याने ५६ वर्षीय गृहिणीचे लक्ष विचलित करून, त्यांच्या हातातील पाकीट हिसकावून सोन्याची पोत लंपास केली. हा प्रकार गजानन महाराज मंदिर चौकात बुधवारी (दि.२८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास भरदिवसा घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी लक्ष्मी धोंडू पवार (५६, रा. गारखेडा परिसर, सूतगिरणी क्वार्टर) यांच्या तक्रारीनुसार, बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्या सूतगिरणी चौक येथून सिडको बसस्थानकाकडे जाण्यासाठी एका रिक्षात बसल्या होत्या. त्यानंतर त्या गजानन महाराज मंदिर चौकाजवळ रिक्षातून उतरून रस्त्याने पायी जात होत्या. त्या चालत असतानाच एक अज्ञात तरुण अचानक त्यांच्याजवळ आला.
तुम्ही गरीब आहात का? अशी विचाराण करत त्याने स्वत:जवळील केळी पवार यांना देण्याचा प्रयत्न केला. त्यावर लक्ष्मी पवार यांनी, मला उपवास नाही, मला केळी नकोत, असे स्पष्ट सांगितले. तरीही तो भामटा पिच्छा सोडत नव्हता; माझे साहेब पुढे उभे आहेत, ते तुम्हाला काहीतरी वस्तू देणार आहेत, असे सांगून तो त्यांना भूलथापा देऊ लागला
सतर्कता दाखवली; पण भामट्याने पाकीटच हिसकावले
त्या अनोळखी तरुणाच्या संशयास्पद हालचाली आणि बोलण्यावरून लक्ष्मी पवार यांना काहीतरी धोका असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी सावधगिरी बाळगत गळ्यातील ५ ग्रॅमचे सोन्याचे डोरले आणि ६ सोन्याचे मणी असलेली पोत काढून स्वतः जवळील पिशवीत असलेल्या एका लहान पाकिटामध्ये ठेवली. मात्र, टपून बसलेल्या त्या भामट्याचे लक्ष त्यांच्या हातावरच होते. महिला दागिना पाकिटात ठेवत असल्याचे पाहताच, त्याने लक्ष्मी यांच्या हातातील पाकीट हिसकावून धूम ठोकली. लक्ष्मी यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत आरोपी नजरेआड झाला होता. पुढील तपास हवालदार शिवाजी शिंदे करत आहेत.