पैठण : पैठण शहराच्यालगत असलेल्या पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून एका महिला डॉक्टरने आपल्या सहा महिन्याच्या बाळासह नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली. या महिलेचा मृतदेह सापडला असून बाळाचा शोध सुरू आहे. ही घटना मंगळवारी (दि.१) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या महिला डॉक्टरने जीवन का संपविले? याचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे. पूजा प्रभाकर व्होरकटे (वय ३२, रा. भवानीनगर पैठण) असे या महिलेचे नाव आहे.
पूजा ही आज (मंगळवारी) सायंकाळी सातच्या सुमारास आपल्या सहा महिन्याच्या बाळासह रिक्षातून पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलाजवळ आली. व त्यानंतर आपल्या बाळासह पुलावरून नदीत उडी मारली. ही बाब काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा करून पैठण पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, सफौ सुधीर वाहूळ, कल्याण ढाकणे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी काही नागरिकांच्या मदतीने पाण्यात शोधकार्य सुरू केले. पाण्यात शोध घेतला असता काही तासात पूजाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान पोलिसांकडून बाळाचा शोध सुरू आहे.