प्रभाकर धुरी
पणजी, पुढारी वृत्तसेवा : तिसवाडी तालुक्यातील सांतइस्तेव बेटावरील आखाडा येथील फेरी धक्क्यावर रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेली कार थेट फेरी धक्क्यावरुन नदीच्या पाण्यात पडली. यावेळी प्रसंगावधान राखत गाडीतील तरुणीने गाडीबाहेर येत आपला जीव वाचवला. मात्र,तिच्या सोबत असलेला तिचा मित्र बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान अग्निशमन दल व पोलिस नदीत गेलेली कार काढण्यासाठी नौदलाची मदत घेत आहेत.
जुने गोवा पोलिसांकडील माहितीनुसार, बाशुदेव भंडारी हा तरुण आपल्या मैत्रीणीला भेटायला गुजरातमधून गोव्यात आला होता. ही तरुणी साखळी येथील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दोघेही रेंट अ कारने फिरत असताना ते सांतइस्तेव येथे पोहोचले. यावेळी मध्यरात्र उलटून गेली होती. पुढे जात आसताना त्यांना त्यांच्या गाडीचा निळ्या रंगाच्या कारमधून कुणीतरी पाठलाग करत असल्याचे आढळून आले. या प्रकाराने दोघेही घाबरले. बराच वेळ हा प्रकार सुरू राहिला.
दरम्यान बाशुदेव याने गुगल मॅपची मदत घेत मिळेल तेथून वाट काढायचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात ते आखाडा-सांतइस्तेव येथील फेरी धक्क्यावर पोहोचले. काळोखात पुढील रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात आलेली कार थेट नदीच्या पाण्यात गेली. काही कळायच्या आतच नदीचे पाणी गाडीत शिरू लागले. यावेळी प्रसंगावधान राखत तरुणीने गाडीतून बाहेर येत आपला जीव वाचवला. तर बाशुदेव गाडीतच अडकून पडला असावा, असे तिने पोलिसांना सांगितले. अपघाताचे कारण नेमके हेच की अन्य काही आहे हे जाणून घेण्यासाठी जुने गोवे पोलिस सक्रिय झाले आहेत.