

Woman dies after being crushed under bus tires
सिल्लोड / केळगाव, पुढारी वृत्तसेवा : माहेराहून सासरी जाताना दुचाकीवरून तोल जाऊन खाली पडलेली महिला बसच्या पाठीमागील टायरखाली दबल्याने ठार झाली. हा अपघात शनिवारी (दि. २५) दुपारी तीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील केळगाव येथे घडला. सविता श्रीराम ज्ञाने (३८, रा. घाटनांद्रा) असे मृत महिलेचे नाव आहे.
मृत महिला दुचाकीवरून (एमएच- २०, एफएफ ३५४३) माहेराहून (केळगाव) सासरकडे (घाटनांद्रा) जात होती. तर या दरम्यान बस (एमएच २०, बीएल १५२२) मुर्डेश्वरहून सिल्लोडकडे जात होती. केळगावजवळच तोल गेल्याने मृत महिला दुचाकीवरून खाली पडली व पाठीमागून येणाऱ्या बसच्या पाठीमागील टायरखाली दबली. यात महिला जागीच ठार झाली. अपघात होताच नागरिकांनी धाव घेत मृत महिलेला सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच बीट जमादार अनंत जोशी यांनी धाव घेत पंचनामा केला. सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. मृत महिलेवर सासरी (घाटनांद्रा) रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. महिलेच्या पश्चात सासू, सासरा, पती, दोन मुले असा परिवार आहे. महिलेच्या अपघाती मृत्यूमुळे केळगाव, घाटनांद्रा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेवटची ठरली भाऊबीज
मृत सविता ज्ञाने भाऊबीजेसाठी माहेरी (केळगाव) आलेली होती. भाऊ, बहीण यांच्यासोबत भाऊबीज आनंदाने साजरी करून शनिवारी सासरी जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात माहेरीच महिलेचा मृत्यू झाला व साजरी केलेली भाऊबीज शेवटची ठरली. महिलेच्या अपघाती मृत्यूमुळे दोन्हीं मुलांचे मातृछत्र हरपले असून सासर व माहेर अशा दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.