

Woman defrauded of ₹7.35 lakh with the lure of a ₹3 crore loan to start an ice factory
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बर्फाचा कारखाना सुरू करण्यासाठी आणि महिला बचतगटांना विविध व्यवसायांसाठी तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची एका भामट्याने ७ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २०२२ साली सहकारनगर भागात घडला. शैलेश बाबूराव कांबळे (रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, गादिया विहार) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध बुधवारी (दि. २४) उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सविता गणेश पाथरे (४१, रा. बजाजनगर) या सुसंकल्प महिला मंडळ आणि सुसंकल्प निधी अर्बन लिमिटेडच्या अध्यक्षा आहेत. मार्च २०२२ मध्ये त्यांची ओळख शैलेश कांबळे याच्याशी झाली होती. कांबळे याने फिर्यादी यांना बर्फाचा कारखाना आणि इतर व्यवसायांसाठी तीन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी केली. मात्र या प्रक्रियेसाठी लागणारा खर्च अगोदर द्यावा लागेल, असे सांगून त्याने वेळोवेळी फिर्यादीकडून रोख आणि ऑनलाईन माध्यमातून एकूण ७ लाख ३५ हजार रुपये उकळले.
पैसे दिल्यानंतरही कर्ज मंजूर न झाल्याने फिर्यादी यांनी कांबळेकडे विचारणा सुरू केली. त्यावेळी तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अधिक चौकशी केली असता, कांबळे याने सहाय्यक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) यांच्या कार्यालयात फिर्यादींच्या नावाने चुकीचा पत्ता आणि स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकून बनावट पत्रव्यवहार केल्याचे उघड झाले. तसेच, पैसे परत मागितल्यावर त्याने दिलेले पंजाब नॅशनल बँकेचे प्रत्येकी एक लाख रुपयांचे तीन धनादेश बँक खाते बंद असल्याने बाऊन्स झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सविता पाथरे यांनी उस्मानपुरा ठाणे गाठून तक्रार दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी चौरे करत आहेत.
तुम्ही फक्त आर्थिक रसद पुरवा
कर्ज मिळवून देण्यासाठी आधी खर्च करावा लागेल. खर्च करण्यासाठी तुम्ही खंड केल्यास तुम्हाला कर्ज अजिबात मिळणार नाही, माझ्या मागणीप्रमाणे वेळोवेळी तुम्ही फक्त आर्थिक रसद पुरवा म्हणजे मी तुमचे कर्ज शंभर टक्के मिळवून देतो. यापूर्वी पाचशे ते सातशे कर्ज मागणीधारकांना एक कोटी ते २५ कोटीपर्यंतचे कर्ज मी स्वतः मिळवून दिले, अशी थाप शैलेश कांबळे याने मारली होती.