

With the municipal elections approaching, meeting sessions have begun among the local leaders of the mahayuti regarding seat-sharing.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी (दि.१९) शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेत शिवसेना (शिंदे गट), भाजपच्या शिष्टमंडळाची दुसरी बैठक झाली. त्यात भाजपने ८२, तर सेनेकडून ८८ वॉर्डात इच्छुक असल्याचा दावा केला गेला. त्यासोबतच दमदार उमेदवारांच्या वॉर्डाची यादीही एकमेकांना सांगण्यात आली. त्यावर आज शनिवारी १ वाजता निर्णायक बैठक होईल, असे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले. परंतु दोन्ही पक्षांचे आकडे आणि राष्ट्रवादीने केलेली ३५ जागांची मागणी यावरून आता महायुतीचे समीकरण जुळेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.
यावेळी भाजपकडून ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे, माजी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, निवडणूक प्रमुख समीर राजूरकर, कोअर कमिटीचे प्रशांत देसरडा, अनिल मकरिये यांची, तर शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी आमदार किशनचंद तनवाणी, राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश जैस्वाल यांची उपस्थिती होती. महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे युतीसाठी शिवसेना-भाजपमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीनंतर शुक्रवारी (दि.१९) दुसरी बैठक या दोन्ही पक्षांच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
कोण कुठे लढेल यावरच चर्चा
या बैठकीबाबत माहिती देताना ओबीसी कल्याण मंत्री सावे म्हणाले की, दोन्ही पक्षांकडे कोणाचा उमेदवार कोणत्या प्रभागातील किती वॉडाँतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, त्यात कोणता इच्छुक हा सर्व दृष्टीने दमदार आहे याबाबतची यादी दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिली. आता त्यावर भाजप त्यांच्या पदाधिकाऱ्यांची अंतर्गत बैठक घेऊन चर्चा करेल आणि शिवसेना त्यांच्या पदाधिकाऱ्यांची अंतर्गत बैठक घेऊन चर्चा करेल. त्यानंतर शनिवारी पुन्हा दुपारी १ वाजता बैठक घेऊन सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
दोघांची मागणी जास्तीचीच
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, पहिल्या बैठकीत एकमेकांकडे जागेची मागणी करताना जास्तीचीच केली जाते. त्यामुळे शिवसेना असो की, भाजप दोघांनी एकमेकांपुढे जास्तीच्याच जागांचे प्रस्ताव ठेवले आहेत. परंतु आकडे सांगितले तर आमच्या इच्छुकांत संभ्रम होईल. दोन्ही पक्षांकडून कोणाचा उमेदवार कोणत्या जा-गेवर चांगल्या पद्धतीने लढू शकतो, त्यावर चर्चा झाली. आता पक्षांतर्गत चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे.
पहिले आमचे होऊ द्या...
महायुतीमध्ये भाजप, शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँगेस अजित पवार गटही आहे. त्यामुळे राष्ट्रवादी बैठकीपासून दूर का, असा सवाल केल्यावर पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, पहिले आमचे होऊ द्या, नंतर त्यांनाही देणार आहोतच.