

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा राजकीय पक्ष, संघटना, न्यायव्यवस्था आणि पत्रकारितेवरील विश्वास कमी झाला असून तो पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज आहे. त्यामुळे राजकीय पक्ष म्हणून निवडणूक राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा दबाव गट म्हणून काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
दीपके यांच्या येथील सिडको, वाळूज महानगर-१ येथील निवासस्थानी बुधवारी व गुरुवारी सीजेपीच्या कोअर कमिटीच्या दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत बेरोजगारी, देशाची अर्थव्यवस्था, इथेनॉल मिश्रित पेट्रोल आदी विषयांवर पक्षाची पुढील भूमिका निश्चित केली जाणार असल्याचे दीपके यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, आमच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाले. केवळ शिक्षणाच्या प्रश्नांपुरतेच नव्हे, तर इतर विषयांबाबतही जनतेतील रोष स्पष्टपणे दिसून आला. हा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी दबाव गट उभारण्याची गरज आहे. आजच्या परिस्थितीत राजकीय पक्ष फोडले जातात, नाहीतर मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जातात.
तेही झाले नाही, तर ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडले जातात. या सर्व प्रकारांमुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे एक वेगळी सामाजिक चळवळ म्हणून आम्हाला जनतेचा पाठिंबा मिळत आहे. झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आम्ही पूर्ण पाठिंबा दिला असून त्यांना मदत करत असून आम्हीदेखील तेथे जाणार असल्याचे दीपके यांनी सांगितले. बैठकीला सौरभ दास, आशुतोष रांका, रत्ना सिंग, वैष्णवी गौर, दीपक बालियान, विजय मल्लगी यांच्यासह कोअर कमिटीचे अन्य पदाधिकारी उपस्थित आहेत.
दाखल झालेले अनेक गुन्हे मागे घेण्यात आले : सौरभ दास
दिल्लीसह देशभरात झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना लागणारी प्रत्येक प्रकारची मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये कायदेशीर तज्ज्ञांची मदत तसेच इतर आवश्यक सहकार्याचा समावेश आहे. पोलिसांनी कोणत्या पद्धतीने गुन्हे दाखल केले, याबाबत आम्ही सरकारशी चर्चा करत आहोत. त्याचेच फलित म्हणून अनेक ठिकाणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत, असा दावा प्रवक्ते सौरभ दास यांनी केला.
प्रवक्ते दास यांच्याविरुद्ध खोटे आरोप : रांका
दुपारी साडेचारच्या सुमारास प्रवक्ते आशुतोष रांका यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अभिजित अय्यर मित्रा यांनी खोटी माहिती पसरवून प्रवक्ते सौरभ दास यांच्याविरुद्ध निराधार आरोप केल्याचा आरोप त्यांनी केला. दास यांच्या घराबाबत चुकीची माहिती प्रसारित करण्यात आल्यामुळे काही यूट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या घरी पोहोचले. यातील काहीजणांनी घरात घुसण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अभिजित अय्यर मित्रा यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रांका यांनी केली.