Chhatrapati Sambhajingar Chaos Over Water Issue in Civic Meeting |पाणीप्रश्नावरून मनपा सभेत 'महाकल्ला'

महापौरांच्या आसनाकडे धावले नगरसेवक, राष्ट्रगीताने गुंडाळली सभा !
महापौरांच्या आसनाकडे धावताना नगरसेवक.
महापौरांच्या आसनाकडे धावताना नगरसेवक.
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर - शहरातील भीषण पाणीटंचाई आणि ड्रेनेजच्या दुर्गंधीवरून गुरुवारी (दि. २७) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा भडका उडाला. नवीन पाणीपुरवठा योजनेवर बोलू न दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आक्रमक होत थेट महापौरांच्या आसनाकडे धावून गेले. हातवारे आणि आरडाओरडीमुळे सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने अखेर महापौरांनी घाईघाईत राष्ट्रगीत सुरू करून सभा गुंडाळली. दुसरीकडे, शहरात १५०० कोटी रुपये खर्च करूनही ड्रेनेजच्या नरकयातना संपत नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावर महापौर समीर राजूरकर यांनी संपूर्ण ड्रेनेज योजनेचे ऑडिट करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले.

मंगळवारी तहकूब झालेली सर्वसाधारण सभा गुरुवारी महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. मात्र, सभेच्या सुरुवातीपासूनच पाण्याचा प्रश्न पेटला. नंदनवन कॉलनीत रात्री-अपरात्री पाणी सोडले जाते, पडेगाव-मिटमिटाचा पाणीपुरवठा बंद आहे. शहराला दररोज २५० एमएलडी पाणी मिळत असल्याचा दावा असेल तर नागरिकांना आठ-आठ दिवसांनी पाणी का मिळते? असे प्रश्नांचे बाण विरोधकांनी सोडले.

महापौरांच्या आसनाकडे धावताना नगरसेवक.
AICTE Approval for Mechatronics Engineering - मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला एआयसीटीईची मान्यता

पाणीपुरवठा योजनेवर बोलू दिले जात नसल्याने वंचितचे नगरसेवक अमित भुईगळ आक्रमक झाले. 'कंत्राटदाराचे हैदराबाद-नागपूर कनेक्शन असल्याने त्याची पोलखोल होऊ नये म्हणून चर्चा रोखली जात आहे', असा गंभीर आरोप भुईगळ यांनी केला. यावर महापौरांनी स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे योजनेवर सभागृहात चर्चा करता येत नाही. तक्रारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडे मांडाव्यात, यावरून महापौर आणि भुईगळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. भुईगळ आक्रमक होऊन महापौरांच्या आसनाकडे धावले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून महापौरांनी तातडीने राष्ट्रगीत सुरू करून सभा संपवली. मात्र, राष्ट्रगीतानंतरही भुईगळ आसनासमोर उभे राहून उत्तराची मागणी करत होते. त्यानंतर इतर सदस्यांनी मध्यस्थी करत त्यांना बाजूला नेले.

महापौरांच्या आसनाकडे धावताना नगरसेवक.
30-Year-Old Dies While Working Out |जिममध्ये व्यायाम करताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

१३ दिवसांनी पाणी; तेही गटारीसारखे !

सत्तेत असलेल्या शिवसेनेचे (शिंदे गट) गटनेते किशोर नागरे यांनीही घरचा अहेर देत प्रशासनावर संताप व्यक्त केला. छत्रपतीनगर भागात तब्बल १३ दिवसांनी पाणी आले, मात्र ते पिण्यालायक तर सोडाच, धुण्या-भांड्यांसाठीही योग्य नसल्याची तक्रार त्यांनी केली. ऋषीकेश जैस्वाल, राजगौरव वानखडे आदींनी विष्णूनगर, भानुदासनगरमधील दूषित पाण्याचा मुद्दा उचलून धरला.

१५०० कोटींच्या ड्रेनेज योजनेचे होणार ऑडिट

शहरातील भूमिगत गटार योजनेवर आजवर १५०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, तरीही रस्त्यावरून ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. नगरसेविका अनिता घोडेले यांच्यासह बालाजी मुंडे, गणेश नावंदर, फेरोज खान, उसामा अब्दुल कदीर आर्दीनी खिल्लारी कन्स्ट्रक्शनच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढले. २०१४ ते २०१९ या काळात ४०० कोटी खर्चुन १८६ किमी वाहिन्या टाकण्यात आल्या आणि ३ एसटीपी उभारले. याच्या देखभाल-दुरुस्तीची १० वर्षांची जबाबदारी कंपनीकडे असताना त्यांच्याकडे केवळ एकच जेटिंग मशीन आहे. सर्वपक्षीय संताप पाहता महापौर राजूरकर यांनी राजू वैद्य यांच्या मागणीनुसार या संपूर्ण योजनेचे सर्वंकष ऑडिट करण्याचे आदेश दिले. या ऑडिटमधून कामाचा दर्जा आणि निधीच्या वापराचे सत्य समोर येणार आहे.

'ते खैरे अन् उबाठाचे पाप' पाणीप्रश्नावरून सभेत

राजकारणही तापले. भाजपचे राजगौरव वानखेडे यांनी हा पाणीप्रश्न चंद्रकांत खैरे आणि उबाठा (शिवसेना ठाकरे गट) गटाचे पाप असल्याचा आरोप केला व भाजप-शिंदे गटाने ते सुधारल्याचे सांगितले. यावरून सभागृहात आणखी गोंधळ वाढला

गोरगरीब हातगाडीचालकांना सणासुदीत दिलासा द्या

पोळा, दहीहंडी, गणपती आणि महालक्ष्मी या सलग येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील हातगाडीधारक आणि फिरत्या विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागाने कारवाई करू नये, अशी आग्रही मागणी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी समेत केली. सणासुदीच्या काळात मातीचे बैल, मूर्ती, पूजा साहित्य विकून अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे पुढील दहा दिवस कारवाई शिथिल करून त्यांना व्यवसायाची संधी द्यावी. यामुळे वाहतुकीला अडथळा न ठरता सामान्य नागरिकांनाही स्वस्तात साहित्य मिळेल, अशी मानवी दृष्टिकोनातून भूमिका मकरिये यांनी मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news