

Water has entered the 2,500 mm main water pipeline.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
जायकवाडी धरणातून जॅकवेलमध्ये सायफान पद्धतीने यशस्वीरित्या पाणी घेण्यात आल्यानंतर सोमवारी जॅकवेल-वरील ३७०० अश्वशक्तीच्या दोनपैकी एक पंप सुरू केले. जॅकवेलमध्ये ११.५० मीटर उंचीपर्यंत पाण्याची लेव्हल घेत पहिल्या पाच तासात पाणी उपसाची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. त्यामुळे आता पाणी मुख्य २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीत दाखल झाले असून पुढील महिनाभर टप्प्याटप्प्याने जलवाहिनी धुण्याचे काम होणार.
शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) माध्यमातून नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून शहराला २०० एमएलडी वाढीव पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. यात सायफान पद्धतीने ३००-३०० व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे जॅकवेलमध्ये पाणी घेण्यात आले. जॅकवेलमध्ये हे पाणी तीन दिवस ठेऊन गळती तपासण्यात आली. परंतु, जेव्हा गळती नसल्याचे अढळले. तेव्हा पुढील प्रक्रियेचा सोमवारी निर्णय घेण्यात आला. यात जॅकवेलमध्ये पाण्याची लेव्हल ११.५० मीटर उंचीपर्यंत घेण्यात आली. ३७०० अश्वशक्तीचा पंप सुरू केला.
या यशस्वी चाचणीनंतर एमजेपी आणि जीव्हीपीआर कंपनीच्या कर्मचास्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, एमजेपीच्या मुख्य अभियंता मनिषा पलांडे, कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीचे महाव्यवस्थापक महेंद्र गोगुलोथु यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. २०० एमएलडी पाण्यासाठी पहिल्या दोन्ही चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. प्रशासनासह कंत्राटदार एजन्सीचा आत्मविश्वास वाढला आहे.
आज दुसख्या पंपाची चाचणी
जॅकवेलवर २५०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी दोन ३७०० अश्वशक्ती क्षमतेचे पंप सध्या उभारण्यात आले आहे. असे चार पंप उभारले जाणार आहेत. परंतु, सध्या पहिल्या टप्प्यासाठी २ पंप उभारले असून त्यातील पहिल्या पंपाची सोमवारी आणि आता दुसख्या पंपाची आज मंगळवारी सकाळी चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर जलवाहिनी टप्प्या टप्प्याने ३-३ किलो मीटरपर्यंत धुण्यास सुरूवात होणार.