

Wastage of water; Municipal Corporation cracks the whip
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आरेफ कॉलनी व हिलाल कॉलनी परिसरात रस्त्यावर पाणी सोडून देणाऱ्या दोन नागरिकांवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी (दि.६) दंडात्मक कारवाई केली. यातील एकाला १० हजार, तर दुसऱ्याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शहरवासीयांना केले आहे. पाणी भरल्यानंतर नळ तातडीने बंद करावा, नळाला योग्य तोटी बसवावी आणि पाणी रस्त्यावर, नालीत अथवा अन्य ठिकाणी वाहून जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच घरगुती नळ जोडणी, नळाच्या तोट्या व अंतर्गत जलवाहिनीतील गळती अथवा आवश्यक दुरुस्तीची सर्व कामे १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर पाण्याची गळती किंवा अपव्यय आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्रथमवेळी ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार आणि तिसऱ्यांदा २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तिसऱ्यांदा कारवाईनंतर फौजदारी गुन्हाही दाखल केला जाणार आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी व नागरी मित्र पथक मंगळवारी आरेफ कॉलनी आणि हिलाल कॉलनी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी अजहर कादिल हे नळाचे पाणी रस्त्यावर सोडून देत असल्याचे आढळले. तर शेख अतिक यांच्या नळाला तोटी नसल्याने पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे आढळून आले.
त्यानुसार कादिल यांना १० हजार व शेख अतिक यांच्यावर ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार उपअभियंता मिलिंद भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, लाईनमन सय्यद अबरार, सचिन पवार, स्वच्छता निरीक्षक व नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
गळती थांबवा, दंड टाळा
महापालिकेने १५ ऑक्टोबरपर्यंत घरगुती नळ, तोट्या आणि अंतर्गत जलवाहिनीतील गळती दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर पाण्याचा अपव्यय आढळल्यास प्रथम ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार आणि तिसऱ्यांदा २५ हजार रुपये दंड होणार आहे. तिसऱ्या कारवाईनंतर फौजदारी गुन्हाही दाखल केला जाणार आहे. दरम्यानपावसाच्या कमतरतेमुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. जायकवाडीत पाणीसाठा असला तरी ऑगस्ट महिनापर्यंत हा साठा पुरवावा लागणार आहे.