

गंगापूर : वाळूज (ता. गंगापूर) येथील टेकडी गल्ली परिसरात एक अत्यंत आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. गाभण न राहताही 'शब्बो' नावाची बकरी रोज १ ते २ लिटर दूध देत असल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या सात वर्षांत तिची एकदाही गर्भधारणा झालेली नाही. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी आणि या अनोख्या बकरीला पाहण्यासाठी सध्या वाळूजमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
वाळूज येथील शेख जलाल शेख अमीन आणि त्यांच्या पत्नी आसिफा यांच्याकडे ही सात वर्षांची 'शब्बो' नावाची बकरी आहे. सात वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबातील एका शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला होता. मात्र, पिल्ले अवघ्या दहा दिवसांची असतानाच त्यांच्या आईचा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर शेख दाम्पत्याने दोन्ही पिल्लांचा मुलांप्रमाणे सांभाळ केला. त्यातील नर पिल्लू विकण्यात आले, तर मादी पिल्लाला 'शब्बो' नाव देऊन शेख दाम्पत्याने तिचा लाडाने सांभाळ केला.
शब्बो मोठी झाल्यानंतर अनेकदा बोकड असलेल्या कळपात सोडून आणि कृत्रिम गर्भधारणेचे प्रयत्न करूनही ती गाभण राहिली नाही. तुर्काबाद खराडी आणि खडकेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांत उपचार करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही.
दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून शब्बोची कास हळूहळू मोठी होत असल्याचे जलाल शेख यांच्या निदर्शनास आले. काही दिवसांनी त्यांच्या सासूबाईनी कुतूहलापोटी दूध काढण्याचा प्रयत्न केला असता, तब्बल दोन ते तीन लिटर दूध निघाले. हा प्रकार पाहून त्यांनी तिला पुन्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेले.
अधिकाऱ्यांनीही हा प्रकार अनोखा असल्याचे सांगून, दूध तपासल्यानंतर ते सेवनासाठी योग्य असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. गेल्या वर्षभरापासून शेख कुटुंबीय शब्बोचे दूध वापरत आहेत. ती सकाळी साधारण १ ते दीड लिटर, तर घरात पाहुणे आल्यास संध्याकाळीही अर्धा ते पाऊण लिटर दूध देत असल्याचे जलाल शेख यांनी सांगितले.
दहा दिवसांची असल्यापासून मुलाप्रमाणे केला सांभाळ
शब्बो अवघ्या दहा दिवसांची असताना पोरकी झाल्यामुळे, शेख दाम्पत्याने (ज्यांना अपत्य नाही) तिला घरातील सदस्यच मानले आहे. तिचा मुलाप्रमाणे सांभाळ केला जातो. ती घरातच राहते आणि तिच्या गळ्यात दोरीही बांधली जात नाही. चहा, बटर, टोस्ट, खारी, भाकरी-कालवण, फळे, भाजीपाला आणि बिस्किटे असा तिचा आहार आहे. रात्री ती चक्क शेख दाम्पत्यासोबतच पलंगावर झोपते.
बकरी गाभण नसतानाही दूध देणे ही दुर्मिळ मात्र वैद्यकीयदृष्ट्या शक्य असलेली बाब आहे. शेळ्यांमध्ये हार्मोन्समधील बदल, विशेषतः प्रोलॅक्टिन हार्मोनची वाढ, तसेच खोटी गर्भधारणा (Pseudopregnancy) यामुळे गर्भनसतानाही दुग्धनिर्मिती होऊ शकते. थनाला वारंवार उत्तेजना मिळणे यामुळेही दूध येत राहू शकते. मात्र नेमके कारण सांगण्यासाठी पशुवैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.
डॉ. दिनेश पंडुरे, पशुवैद्यकीय अधिकारी