

Wait and watch for the alliance.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये ताणाताणी सुरूच आहे. रविवारी (दि.२८) दिवसभर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत काहींना उमेदवारी दाखल करण्याच्या सूचनाही केल्या असून, रात्री उशिराने पालकमंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांच्यात बैठक होऊन युतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत युतीचा निर्णय अद्यापही जागा वाटपावरून प्रलंबित आहे. मागील दोन आठवड्यांपासून दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक कोअर कमिटीच्या सदस्यांची तब्बल ९ वेळा बैठका झाल्या. यात पहिल्यांदा भाजपने शिवसेनेला ६५-२५ असा जागा वाटपाचा फार्म्युला दिला होता.
mत्यावर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करीत प्रस्ताव फेटाळला. त्यांनतर सेनेने २०१५ सालचा फार्म्युला दिला. परंतु भाजपने त्यावर नकार दर्शविला. अखेर फिफ्टी फिफ्टीचा प्रस्ताव पुढे केला गेला. परंतु भाजपच्या काही सदस्यांनी त्यास विरोध करीत आता पूर्वीसारखी परिस्थिती नसून भाजपची ताकद वाढली आहे, असे सांगत जागा वाटपात मोठा वाटा लागेल, असे म्हणत ५५ जागांची मागणी केली.
मात्र सेनेने त्यास विरोध दर्शविल्यानंतर शेवटी ४७-४० चा फार्म्युला पुढे केला गेला. यात चार प्रभागांतील १५ जागांवर दोन्ही पक्षांमध्ये मतभेत कायम असून, तो प्रस्ताव मुंबईतील वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शनिवारी दुपारी पाठविण्यात आला.
त्यावर शनिवारी रात्री वरिष्ठांकडून दोन्ही पक्षांना काही सूचना आल्या आहेत. परंतु अद्यापही त्यावर दोन्ही पक्षांकडून काहीही जाहीर करण्यात आले नाही. दरम्यान, रविवारी रात्री उशिराने मंत्री शिरसाट आणि मंत्री सावे यांची बैठक होऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
अर्ज तयार ठेवण्याचे आदेश
युती होणारच असेच शिवसेना भाजपकडून सांगण्यात येत आहे. परंतु ऐनवेळी युती फिसकटलीच तर सर्वच इच्छुकांनी उमेदवारीसह सज्ज राहावे, अशीही सूचनाही करण्यात आल्याची चर्चा आहे.
आज होणार युतीचा निर्णय
युतीच्या निर्णयासाठी आज भाजप कोअर कमिटी सकाळी बैठक होणार आहे. त्यानंतर शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात युतीचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.