

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर तेरा दिवसांत ४ हजार ३४४ आक्षेप दाखल झाले आहेत. यातील १९०४ आक्षेप आतापर्यंत निकाली काढले असून, उर्वरित २१०५ आक्षेपही निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. मतदारांऐवजी इच्छुकच एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नावे टाकण्यावर भर देत आहेत. परंतु कोणाच्या सांगण्यावरून नव्हे तर स्थळपाहणी करून मतदारांशी संवाद साधूनच आक्षेप निकाली काढण्यात येईल, असा इशारा गोंधळ घालणाऱ्यांना प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिला.
प्रारूप याद्यांमध्ये घोळ झाल्याची ओरड प्रत्येक प्रभागातून सुरू होताच मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना आक्षेपांची स्थळपाहणी करून निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिशय वेगाने स्थळपाहणी आणि आक्षेपधारकांशी संवाद साधूनच हरकती निकाली काढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या प्रक्रियेवेळी अनेक आक्षेप मतदारांनी नव्हे तर संबंधित प्रभागातून इच्छुक असलेल्यांनी स्वः हितासाठी मोघम पद्धतीने दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर दाखल होणाऱ्या हरकती आणि सूचनांचा निपटारा अत्यंत जलदगतीने केला जात आहे. महापालिकेला सोमवारपर्यंत ४३४४ हरकती प्राप्त झाल्या त्यापैकी १९०४ हरकती निकाली काढल्या आहेत.
मनपाचे प्राधिकृत अधिकारी, प्रगणक हे आक्षेपांची जागेवर जाऊनच पडताळणी करीत आहेत. मतदानाच्या दिवशी होणाऱ्या गोंधळाऐवजी आजच प्रारूप मतदान याद्यातील चुका आणि केले. आक्षेपांवरून झालेला गोंधळ बरा आहे. आताच्या गोंधळावर तातडीने निर्णय घेता येईल, परंतु निवडणुकीवेळी काहीच करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आलमगीर कॉलनी, संजयनगर, रावरसपुरा येथील आक्षेपांबद्दल माहिती देताना प्रशासक म्हणाले, आलमगीर कॉलनीतील मतदार प्रभाग क्रमांक ३ मध्येच आहेत. रावरसपुराचे काही गट आणि माजी सैनिक कॉलनी महापालिकेच्या हद्दीत आहे. हे नाव सारखेच असल्याने ते दुबार आहेत का, याबाबत पडताळणी केली जात आहे. आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून मतदार यादी शुध्द करण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण मतदार यादीत मतदार वाढवणे किंवा कमी करणे याचे अधिकार महापालिकेला नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुबार मतदारांवर प्रक्रिया सुरू
दुबार मतदारांचीही पडताळणी केली जात असून, त्यांची यादी झोन कार्यालय, निवडणूक कार्यालय आणि ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली. दुबार मतदारांनी झोन कार्यालयात जाऊन त्यांना कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचे हे लेखी स्वरूपात द्यावे लागेल.
अपेक्षेपेक्षा हरकती कमीच
छत्रपती संभाजीनगरात महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच प्रभागनिहाय होत आहे. त्यामुळे मतदार यादीवर मोठ्या संख्येने आक्षेप येतील हे अपेक्षितच होते. परंतु मतदार संख्येच्या तुलनेत आक्षेपांची संख्या कमीच असून, दाखल आक्षेपांमध्ये २५ हजार मतदारांच्या नावांचा समावेश आहे.