Vaijapur Hospital Dispute : वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात धक्काबुक्की

आमदारांचा पुतण्या व कर्मचाऱ्याचा वाद
Vaijapur Hospital Dispute
आमदार बोरणारे यांचा पुतण्या व रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यामध्ये झालेली झटापट.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि.9) सायंकाळी आमदार रमेश बोरणारे यांच्या पुतण्या आणि रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यामध्ये वाद झाल्याची घटना घडली. या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णांच्या क्रमांकावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुणाने आपण आमदारांचा पुतण्या असल्याचे सांगत आपला नंबर आधी लावण्याची मागणी केली. मात्र, रुग्णांना नियमानुसार आणि क्रमांकानुसारच सेवा दिली जात असल्याचे कर्मचाऱ्याने स्पष्ट केले.

Vaijapur Hospital Dispute
Kalyan News : कल्याण न्यायालयात पार्किंगचा वाद; पोलिसाकडून वकिलाला मारहाण, जिल्हा न्यायाधीशांचे कारवाईचे आदेश

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कर्मचारी उपस्थित नागरिकांशी बोलताना दिसत असून, सर्व रुग्णांना क्रमाने घेत असल्याचे तो सांगताना ऐकू येतो. त्यानंतर आमदारांच्या पुतण्याने, इथे नको, तिकडे जाऊन लाईन कशी सुरू आहे ते बघा, असे सांगितल्याचे ऐकू येते. यानंतर दोघांमधील वाद वाढल्याचे दिसून येते. याचदरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत कर्मचारी खाली पडल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

तसेच, संबंधित कर्मचाऱ्यांचे कपडेही फाटल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर काही काळ दोघांमध्ये झटापट झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून, तशी माहिती प्रत्यक्षदर्शींनीही दिली. घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Vaijapur Hospital Dispute
Jalgaon crime news: बसच्या गर्दीत हातसफाई करणारी 'लेडी गँगस्टर' जेरबंद; बाजारपेठ पोलिसांची कामगिरी

या प्रकारामुळे शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या घटनेबाबत दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे करण्यात येत असून, उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत पोलिस तक्रार दाखल झाल्याची नोंद नव्हती. पोलिस आणि संबंधित प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली जात होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news