

Verul housefull for three days due to consecutive holidays
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने लाखो पर्यटक वेरूळ येथे दर्शनासाठी येत आहेत. वाहनांच्या रांगा दोन किलोमीटरपर्यंत लागल्या असल्याचे चित्र शुक्रवार, शनिवार, रविवारी दिवसभर बघावयास मिळाले. यावेळी आलेल्या पर्यटकांना वाहन लावण्यासाठी योग्य पार्किंग न मिळाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाटेल तिथे वाहने लावून पर्यटकांनी लेणी बघत भगवान श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतले.
शुक्रवारी स्वातंत्र्य दिन, शनिवारी गोपाळकाला / गोकुळाष्टमी आणि रविवारी शासकीय सुट्टी असल्याने परिसरामध्ये मोठ्या संख्येने देशभरातून पर्यटक लेणी बघावण्यासाठी आलेले आहेत. याचा फायदा येथील स्थानिक व्यापाऱ्यांना मोठ्या संख्येने झाला आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे लॉजिंग, हॉटेल्स व्यावसायिकांचा चांगला फायदा झाला. यामुळे स्थानिक नागरिकात उत्साहवर्धक वातावरण आहे.
खुलताबादेत चौथ्या शनिवारी भाविकांची रीघ श्रावण महिन्याचे चौथ्या व शेवटच्या शनिवारी श्री भद्रा मारुती मूर्तीची मोरपीसची आकर्षक अशी साजवत करण्यात आली होती. श्रावणाचा चौथा व शेवटचा शनिवार असल्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी केली होती.
दर्शनासाठी भाविकांची गर्दी श्री भद्रा मारुतीचे दर्शनासाठी शुक्रवार पासूनच नासिक, अहिल्यानगर, जालना, धुळे, जळगाव या जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून भाविकांचे जथ्येच्या जध्ये खुलताबाद येथे दर्शनासाठी पायी येत होते. पावसामुळे रात्री पायी येणाऱ्या भाविकांच्या गर्दी कमी दिसून आली. संपूर्ण परिसर जय भद्रा, जय हनुमान कि जयच्या नामघोषाने दणाणून गेले होता.
शनिवारी पहाटे भद्रामारुतीचे मुर्तीस मंगल स्नान घालण्यात आले होते. मूर्तीला आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते संस्थांचे सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पुजा करून महाआरती करण्यात आली. शुक्रवारी, शनिवार, रविवारी असल्यामुळे रात्री पासूनच गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रात्री पासूनच दूरदूर पर्यंत रांगा लागल्या होत्या. रविवारी तर दुचाकी, चारचाकी वाहनांद्वारे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे वाहनतळही अपुरे पडत होते. भाविकांच्या अलोट गर्दीने मागील तीन श्रावणी शनिवारच्या गर्दीचा उच्चांक मोडला असून रात्री उशिरापर्यंत लाखो भाविकांनी श्री भद्रा मारुतीचे दर्शन घेतले.