

Verul Caves: Cultural, Historical Splendor: Stephen Pressner
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: वेरूळ येथील जागतिक वारसास्थळ असलेल्या लेणीला भेट दिल्यानंतर जगातील आश्चर्य बघण्याचा योग आला. ते जागतिक सांस्कृती, ऐतिहासिक वैभव आहे. हे वैभव जगातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या नयनात साठवून ठेवावे, असा संदेश संयुक्त राष्ट्र संघाच्या भारतातील समन्व्यक स्टीफन प्रेसनर यांनी दिला.
प्रेसनर कुटुंबीयांसह खासगी दौऱ्यावर शहरात आले आहेत. त्यांनी रविवारी (दि.२२) वेरूळ लेणीला भेट दिली. यावेळी लेणीचे वैभव पाहून ते भारावून गेले. या जागतिक वारशाची अद्भुतता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न होणे महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
रविवारी सकाळी साडेदहा वाजेपासून अडीच वाजेपर्यंत वेरूळ लेणीचे वैभव पाहत, कैलास लेणीवर जाऊन चारही कोपरे अगदी बारकाईने पाहिले. यावेळेस दौलताबाद येथील देवगिरी किल्ला बघता आला नाही तरी आम्ही पुन्हा ऑगस्ट महिन्यात आठ दिवसांच्या सहलीवर येण्याचे सूतोवाच प्रेसनर यांनी केले.
पुन्हा येण्याचे आमंत्रण
लेणीत पाहुण्यांचे वेरूळ येथील लेणी संरक्षण सहाय्यक कोळी यांनी स्वागत केले. यावेळी पर्यटन मार्गदर्शक डॉ. सुभाष जाधव व महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन सहाय्यक डॉ. शिवाजी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र पर्यटन विभागाचे प्रादेशिक पर्यटन उपसंचालक विजय जाधव व महापौर समीर राजुरकर यांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरला पुन्हा येण्याची विनंती केली.