

विलास बा.जाधव
जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथील जिल्हा परिषद प्रशालेस आज गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती कवडदेवी तसेच गटशिक्षणाधिकारी रवी कवडे यांनी अचानक भेट देत शाळेतील विविध सुविधा व योजनांचा सखोल आढावा घेतला.
या धडक पाहणीदरम्यान शाळेतील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याने अधिकाऱ्यांनी शिक्षक व व्यवस्थापनाची चांगलीच कानउघाडणी केली. काही दिवसांपासून शाळेतील गैरप्रकार, चोरीची घटना, स्वच्छतेचा अभाव तसेच शिक्षकांच्या वेळेवर उपस्थितीबाबत गंभीर बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या गेल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची तपासणी केली.
पाहणीदरम्यान शाळेत स्वच्छतागृहाची सुविधा नसणे, वर्गखोल्यांची जीर्ण अवस्था तसेच स्वच्छता व्यवस्थेचा अभाव स्पष्टपणे दिसून आला. विद्यार्थ्यांना आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण मिळत नसल्याने अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शाळेतील काही शिक्षक वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येताच अधिकाऱ्यांनी शिक्षकांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, शाळेतील हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही.
शालेय पोषण आहार योजना, स्वच्छता अभियान व शैक्षणिक सुविधा याबाबत अधिकाऱ्यांनी शिक्षकांशी चर्चा करत सांगितले की, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी योजना फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवल्या गेल्या पाहिजेत. मुख्याध्यापक रामप्रसाद शेळके व सर्व शिक्षकांना तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या पाहणीवेळी शिक्षण विस्तार अधिकारी दिनेश शिंगणगारे, केंद्रप्रमुख डॉ. विजय पंजरकर , झांबरे आदींसह गावचे सरपंच ॲड. रतन तार्डे , ग्रामसेवक , पोलीस पाटील शिवाजी जाधव, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे शाळेतील त्रुटींवर तातडीने कारवाई होऊन सुविधा अधिक सक्षम होतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.