

Various leaders, including the Guardian Minister, met Date Patil
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शाश्वत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विभागीय आयुक्तालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ज्येष्ठ आरक्षण अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्या आमरण उपोषणाला रविवारी (दि. १६) आठ दिवस झाले असून प्रकृती खालवत चालली आहे. उपोषणस्थळी शनिवारी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
उपोषण सोडण्याची विनंती त्यांनी केली. मात्र, शाश्वत मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार दाते पाटील यांनी व्यक्त केला. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन शिरसाट यांनी दिले.
शनिवार व रविवारी खासदार कल्याण काळे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी दाते पाटील यांची मेट घेतली. यावेळी प्रा. माणिकराव शिंदे, योगेश शेळके, लक्ष्मण शिरसाठ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान आठ दिवस उलटूनही प्रशासनाकडून आंदोलनाची ठोस दखल घेतली नसल्याचे दाते पाटील यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. मराठा-कुणबी नोंद अथवा वंशावळ नसलेल्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच एसईबीसी प्रवर्गाला ओबीसीप्रमाणे शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती, शुल्क सवलत व शासकीय योजनांचा लाभ द्यावा, आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
कोटी, तर स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दहा हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा. प्रलंबित उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात, तसेच कायगाव येथे मराठा हुतात्मा स्मारक उभारावे, अशा मागण्याही दाते पाटील यांनी मांडल्या. उपोषणस्थळी प्रा. माणिकराव शिंदे, योगेश शेळके, लक्ष्मण शिरसाठ, रवींद्र वाहटूळे, संग्राम जगताप, जगन्नाथ तायडे, हनुमंत कदम, अमोल जामुंदे, रेखा वाहटूळे, तनश्री गायकवाड, अर्चना मोहिते, निखिल काकडे, शुभम नवले यांच्यासह अनेक पदाधिकारी व आंदोलक उपस्थित होते.
गाजर स्वाहा आंदोलन करून केला निषेध
उपोषणकर्ते दाते पाटील यांच्या समर्थनार्थ शाश्वत मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. १६) 'गाजर स्वाहा' आंदोलन करून शासनाच्या फसव्या व निष्फळ निर्णयांचा निषेध करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्तालयासमोरील उपोषणस्थळी होम करून मराठा आरक्षणासंदर्भातील शासनाचे निष्फळ निर्णय 'स्वाहा' करण्यात आले. या आंदोलनातून मराठा समाजाला आरक्षणाचा ठोस व शाश्वत निर्णय देण्याची मागणी करण्यात आली.
प्रकृती खालावल्याने मराठा समाजात आक्रोश
दरम्यान, दाते पाटील यांच्या उपोषणाचा रविवारी आठवा दिवस होता. शुगर आणि बीपीचा त्रास असलेल्या दाते पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांची शुगर लेव्हल कमी झाली असून अशक्तपणा वाढला आहे. तसेच इम्युनिटीही कमी झाली असून उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, दाते पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे त्यांची खालावत चाललेली प्रकृती आणि प्रशासनाकडून उपोषणाबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याने मराठा समाजात आक्रोश निर्माण झाला आहे. या आक्रोशाचा उद्रेक होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे