

Valuables worth lakhs, including 8 tolas of gold jewellery, stolen from a railway official's home
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पती-पत्नी नोकरीनिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून मोलकरणीने कपाटातील सोन्या-चांदीचे साडेआठ तोठ्याचे दागिने व रोकड असा लाखोंचा ऐवज चोरून नेला. संशय आल्याने घरमालकिणीने घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तिला रंगेहाथ पकडले. ही घटना इंडोजर्मन टूल रूम क्वॉर्टर परिसरात मंगळवारी (दि. २४) सकाळी घडली. याप्रकरणी सुनिता पडुळे (४५, रा. मिसारवाडी) हिच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला अटक केली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
रेल्वे खात्यात कार्यालय अधीक्षक असलेल्या निलीमा मनोज ठाकरे (५६) या पतीसह इंडोजर्मन टूल रूम क्वॉर्टरमध्ये राहतात. सकाळी नऊ वाजता पती, तर दहा वाजता निलीमा कामावर गेल्यानंतर सुनिता ही मागील दहा महिन्यांपासून घरकामासाठी येत होती.
ऑक्टोबर महिन्यात निलीमा यांना देवघराशेजारील कपाटातून सोन्याचा चोकर, गोप आणि अंगठी गहाळ झाल्याचे दिसले. दिवाळीपर्यंत शोध घेऊनही दागिने न सापडल्याने त्यांनी घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मोबाईलवर अॅक्सेस घेतला. यात सुनिता ही टेबलचे ड्रॉवर व कपाट तपासत असल्याचे दिसले.
मंगळवारी गुरुनानक जयंतीची सुट्टी असल्याने निलीमा घरीच होत्या. सकाळी बाहेर जाण्याचा बहाणा करून त्या घराबाहेर थांबल्या आणि मोबाईलवर सीसीटीव्हीचे लाईव्ह फुटेज पाहू लागल्या. यावेळी सुनिताने देवघराच्या ड्रॉवरमधून चावी काढून कपाटातील सोन्याचे लॉकर उघडताच निलीमा यांनी धाव घेत तिला रंगेहाथ पकडले. मात्र, तिने बहाणे करत तेथून पळ काढला.
हा ऐवज गेला चोरीला
प्रत्येकी १ तोळ्याचे सोन्याचे दोन गोप, दीड तोळ्याची मोहनमाळ, १ तोळ्याचा चोकर, एक तोळ्याचा कडा, ८ व १० ग्रॅमच्या दोन अंगठ्या, ५ ग्रॅमचे कानातले वेल, चांदीचे पैंजण आणि देवघरातील ५० हजारांची रोकड असा लाखोंचा ऐवज चोरीस गेला. पुढील तपास उपनिरीक्षक राहुल बिघोत करत आहेत.