

वैजापूर : शहरातील पंचायत समिती कार्यालय परिसरात बेशिस्त पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्यालयीन वेळेत दुचाकी व चारचाकी वाहनांची अनियमित उभी करण्यात येणारी गर्दी इतकी वाढते की, परिसरात ये-जा करणेही कठीण होते.
पंचायत समितीत विविध कामांसाठी ग््राामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. मात्र वाहनांसाठी स्वतंत्र व व्यवस्थित पार्किंगची सुविधा नसल्याने किंवा असली तरी तिचा योग्य वापर न केल्यामुळे वाहनचालक कुठेही दुचाकी उभ्या करत आहेत.
परिणामी मुख्य प्रवेशद्वार, रस्ते आणि पादचारी मार्ग अडवले जात असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर अतिक्रमानाचाही मोठा विळखा पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
पंचायत समिती परिसरात येताना पार्किंगसाठी योग्य जागा मिळत नाही. त्यामुळे गाड्या कुठेही लावाव्या लागतात. प्रशासनाने स्पष्ट नियोजन करून पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
उपाययोजना करणे गरजेचे
दरम्यान, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने पार्किंगसाठी निश्चित जागा ठरवून त्यावर कठोर अंमलबजावणी करणे, आवश्यक असल्यास सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे, वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा समस्या अधिकच बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व्यावसायिकांची 365 दिवसांची पार्किंग
शहरातील सार्वजनिक जागांवर काही मोजक्या व्यावसायिकांनी वर्षभरासाठी जणू खासगी पार्किंगच तयार केले आहे. यामुळे सामान्य नागरिकांना वाहन उभे करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिथे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी पार्किंग आहे तिथेही यांची वाहने दररोज तिथेच आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देत कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.