

Two people were beaten up; Lachchu wrestler arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महिलेची छेड काढून तिची पर्स घेऊन पळणाऱ्याला मारहाण करणाऱ्याच्या तावडीतून सोडवून घेऊन जाणाऱ्या दोघांना ३० ते ३५ जणांनी डांबून जबर मारहाण केली. कड्याने नाकावर ठोसा मारल्याने एकाचे नाक फॅक्चर झाले. तलवारी उपसण्यात आल्या. त्यामुळे दोन गट आमनेसामने येऊन तणाव निर्माण झाला होता. ही घटना बुधवारी (दि. ३०) रात्री पावणेबाराच्या सुमारास धावणी मोहल्ला, अंगुरीबाग येथे घडली.
लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहेलवान (५४), उमेश, लल्ला, साहिल व इतर ३० ते ३५ इसम अशी आरोपींची नावे आहेत. लच्छू पहेलवान याला गुरुवारी रात्री उशिरा सिटी चौक पोलिसांनी अटक केली.
फिर्यादी मोहम्मद कैफ शेख आतिक उर रहेमान (२१, रा. लोटाकारंजा) याच्या तक्रारीनुसार, तो रात्री त्याचा मित्र दानिश नजीर खान सोबत जाणार होता. त्यावेळी एक २१ वर्षांचा मुलगा पळत जाताना दिसला. त्याच्या मागे आलेल्या चार ते पाच तरुणांनी त्याला गाठून दांड्याने मारहाण सुरू केली. त्यावेळी मुलाची मदत करण्याच्या दृष्टीने टोळक्याच्या ताब्यातून तरुणाला सोडविले. मारहाणीचे कारण विचारले असता त्याने एका महिलेची छेड काढून तिची पर्स हिसकावल्याचे समजले.
तेव्हा त्या मुलाची दया आली म्हणून टोळक्याला कैफ म्हणाला की, ती महिला जिथे असेल तिथे या मुलाला घेऊन जाऊ. त्यानंतर कैफ आणि दानिश त्या अनोळखी मुलाला मोपेडवर घेऊन त्याच्या सांगण्यानुसार धावणी मोहल्ला, अंगुरीबाग येथे घेऊन गेले. तिथे आरोपी उमेश आला. त्याने त्या मुलाला मारहाण सुरू केली. त्यानंतर दानिश व कैफलाही मारहाण केली. लच्छू पहेलवाननेही दोघांना मारहाण करत या दोघांना वरच्या खोलीत नेऊन बांधून ठेवण्यास सांगितले. तिथे काही वेळात आणखी ३० ते ३५ इसम जमा झाले. त्यांनी दोघांना शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. उमेश वरच्या मजल्यावरून हातात तलवार घेऊन धावत खाली आला.
तेव्हा त्यांना कोणी तरी वर घेऊन गेले. उमेशने नाकावर कड्याने मारल्याने कैफचे नाक फॅक्चर झाले. खोलीत डांबून ठेवल्यानंतर तेथे लोक यायचे आणि दोघांना मारहाण करून निघून जायचे, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात दंगलीच्या विविध कलमाखाली, शस्त्र अधिनियमसह गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.