Two mangalsutras were stolen within a span of 15 minutes.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्यांनी पुन्हा एन्ट्री केली असून, जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात मंगळसूत्र चोरट्यांनी १५ मिनिटांच्या अंतरात सलग दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. या घटना उल्कानगरी परिसरात ७ ऑगस्ट रोजी रात्री घडल्या. दोन्ही प्रकरणांत चोरटे एकाच वर्णनाचे असून, विना नंबरच्या दुचाकीवरून आले होते.
पहिल्या घटनेत सुनील मगनराव शिंदे (४९, रा. हसूल) हे पत्नीसह उल्कानगरीतून स्कुटीवरून सेव्हन हिलकडे जात असताना रात्री ८ वाजता बंजारा बारसमोर एका विनाक्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने सुनील शिंदे यांच्या पत्नीच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पळवले.
तर दुसऱ्या घटनेत यापूर्वीच रात्री ७.४५ वाजता जुनी चौरंगी, उल्कानगरी येथे सुरेश अनंतराव कुलकर्णी (रा. कासलीवाल विश्व एम अपार्टमेंट) पत्नीसह दुचाकीवर जात असताना, सुरेश कुलकर्णी यांच्या पत्नीच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोथ हिसकावून पळ काढला. यावेळी सोन्याच्या पोतीचा काही तुटलेला भाग बॅगेतच अडकून राहिला. दोन्ही घटनांत सुमारे ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले.
चोरटे एकाच वर्णनाचे
दोन्ही घटना एकाच परिसरात केवळ १५ मिनिटांच्या अंतराने घडल्या. या घटनांत विनाक्रमांक दुचाकीवर येणारे दोन तरुण सारख्याच वर्णनाचे होते. सणासुदीचे दिवस सुरू होताच मंगळसूत्र चोरटे सक्रिय झाल्याने महिलांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी मंळसूत्र चोरट्यांविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.