

Two elderly women's bags and jewelry were snatched
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहरात चोरांनी धुमाकूळ घातला असून, भरदिवसा दोन ठिकाणी चोरट्यांनी वृद्ध महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, पिशवी हिसकावून नेली. या घटना शनिवारी (दि.११) दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास रोशनगेट आणि जुबली पार्क येथे घडल्या.
पहिल्या घटनेत फिर्यादी फैमिदा शेख रशीद (५०, रा. कटकटगेट) या रोशनगेट ते किराडपुरा रस्त्याने पायी जात होत्या. महाराष्ट्र बँकेसमोर येताच दोन चोरटे पायी त्यांच्याजवळ आले. एकाने गळ्यात हात घालून साडेतीन ग्रॅमचे मंगळसूत्र, तर दुसर्याने कमरेला अडकविलेली पिशवी, मोबाईल हिसकावून धूम ठोकली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत फिर्यादी चंद्रकलाबाई सुधीर पाटसकर (६५, रा. धावणी मोहल्ला) दुपारी साडेबाराच्या सुमारास थकल्याने जुबली पार्क येथील पाण्याच्या टाकीजवळ भिंतीला टेकून बसल्या होत्या. त्याचवेळी दोन चोरटे त्यांच्याकडे आले. त्यांनी चंद्रकलाबाई यांच्या जवळील पिशवी हिसकावून पळून गेले. पिशवीमध्ये पाच हजारांची रोख आणि १ ग्रॅमचे सोन्याचे मणी होते. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.