Water Tankers Leak : इंधन अन् दुधाचे टँकर गळत नाहीत, मग पाण्याचेच का ?

तालुक्यात गळक्या टँकरमधून पाण्याची नासाडी; सभापतींकडून टँकरची तपासणी
Water Tankers Leak
इंधन अन् दुधाचे टँकर गळत नाहीत, मग पाण्याचेच का ?file photo
Published on: 
Updated on: 

Fuel and milk tankers don’t leak—so why do water tankers?

रमाकांत बन्सोड

गंगापूर : एकीकडे दुष्काळी गावांतील नागरिक हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत असताना, दुसरीकडे पाणीपुरवठा करणाऱ्या गळक्या टँकरमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचा प्रकार गंगापूर तालुक्यात समोर आला आहे. टँकरमधून गावापर्यंत पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरच वाहून जात आहे. विशेष म्हणजे, गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाला ठेकेदाराने केराची टोपली दाखवली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Water Tankers Leak
MSRTC : एसटीचे सर्व्हर डाऊन : ॲडव्हान्स बुकिंग ठप्प

गंगापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, अनेक टँकर जीर्ण आणि गळके असल्याने त्यातून पाण्याची गळती होत आहे. एका बाजूला नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना दुसरीकडे रस्त्यावर वाहून जाणारे पाणी पाहून ग्रामस्थांमध्ये संताप आहे. पेट्रोल, डिझेल आणि दुधाच्या टँकरमधून गळती होत नाही, मग पिण्याच्या पाण्याचेच टँकर गळके का, असा सवाल नागरिक करत आहेत.

या प्रकाराची पंचायत समिती प्रशासनाने दखल घेतली होती. गंगापूरचे गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे यांनी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी टँकर पुरवठादार ठेकेदार रमेश मनियार यांना लेखी नोटीस बजावली होती. टँकरमधील गळती तातडीने थांबवून सर्व टँकर दुरुस्त करावेत आणि यापुढे पाणीपुरवठ्याबाबत तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश दिले होते. या नोटिशीच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या होत्या.

टँकरमधून मात्र, नोटिशीनंतरही गळक्या पाणीपुरवठा सुरूच असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पंचायत समिती सभापती कविता रवींद्र चव्हाण आणि उपसभापती राजेश्वर हिवाळे यांनी तालुक्यातील विविध ठिकाणी टँकरची तपासणी केली. यावेळी अनेक टँकर गळके असल्याचे आढळले. काही टँकरवर चढून त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि गळती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. संबंधित टँकर तातडीने बंद करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या.

Water Tankers Leak
Sambhajinagar News : वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी लवकरच जीआर व निधी

सावंगी (लासूर स्टेशन) येथे पाणीपुरवठ्यासाठी जाणारा टँकर उपसभापती राजेश्वर हिवाळे आणि भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थांबवून तपासला असता तोही गळका असल्याचे आढळले. आता प्रशासन संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करणार आणि टंचाईग्रस्त गावांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नोटीस देऊनही गळती सुरूच !

गंगापूर पंचायत समितीने १२ नोव्हेंबर रोजी गळक्या टँकरप्रकरणी ठेकेदाराला नोटीस बजावली. टँकर दुरुस्त करूनच पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. मात्र, नोटिशीनंतरही गळती थांबलेली नाही. सभापती व उपसभापतींच्या तपासणीत अनेक टँकर गळके आढळले. त्यामुळे नोटीस केवळ कागदावरच राहिली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टंचाईत पाण्याची नासाडी

एका बाजूला नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकावे लागत आहे, तर दुसरीकडे गळक्या टँकरमधून पाणी रस्त्यावर वाहत आहे. टँकरची क्षमता पूर्ण असतानाही गावात कमी पाणी पोहोचत असेल, तर या नासाडीची जबाबदारी कोणाची ? प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करून टँकरची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.