

Two arrested for burglarizing a house at knifepoint
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा : वेदांतनगर परिसरातील केशरी बंगल्यात १५ जुलै रोजी चाकूचा धाक दाखवून गळ्यातील १ लाखाचे मिनी गंठण आणि चार हजारांची रोकड लुटून नेणाऱ्या दोन सराईत घरफोड्यास वेदांतनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना शनिवारी (दि.१९) पोलिस कोठडीचे आदेश दिले होते.
मयूर अरुणकुमार पाटणी (३५, रा. केशरी बंगलो, वेदांतनगर) यांच्या तक्रारीनुसार मंगळवारी रात्री दोघांनी घरातून एक लाख रुपये किमीतीचे सोन्याचे गंठण आणि रोख रक्कम असा १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज पळवला होता. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाअंती पोलिसांनी आकाश ऊर्फ उरू सुनील अहिरे (१९ रा. छोटा मुरलीधरनगर), आकाश राजू खरे ऊर्फ गयब्या (२१ रा. उस्मानपुरा) या दोघांना अटक केली आहे. हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव, उपनिरीक्षक मोरे, उपनिरीक्षक जोशी, सुलाने, मुळे आदींच्या पथकाने केली.