

Three arrested for stealing cash along with bullets
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गारखेडा परिसरात भरदुपारी पाच जणांच्या टोळीने तरुणाला चाकूचा धाक दाखवत बुलेटसह रोख रुपये लुटल्याचा थरार शुक्रवारी (दि.१८) दुपारी ३.३० वाजता गारखेडा परिसरात घडला.
गुन्हा घडल्यानंतर काही तासांतच पुंडलिकनगर पोलिसांनी प्रतीक ऊर्फ पिन्या गणेश खडके (२३, रा. गल्ली. क्र.४), रोहित शत्रुघ्न पवार (२४, रा. गल्ली क्र. ८ गारखेडा) आणि दीपेश ऊर्फ दिप्या संजय सिंग (३०, रा. रामगाव, जि. वाराणसी) आदी तिघांच्या मुसक्या आवळल्या. या तिघांना न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश शनिवारी (दि.१९) दिले.
ओम कृष्णा राठोडचे (२१, रा. पृथ्वीराज नगर, गारखेडा) उल्कानगरी येथे मोमोजचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी ते मित्राची बुलेट (एमएच-०५-सीएफ-२९४९) घेऊन कॅनॉटकडे जात असताना चोंडेश्वरी मंदिर रस्त्याजवळ पाच जणांच्या टोळक्याने त्याला अडवले, व चाकूचा धाक दाखवत बुलेटसह त्यांच्या खिशातील १२८० रुपये घेऊन पसार झाले. या प्रकरणी राठोडच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक अर्जुन राऊत व त्यांच्या पथकाने पाच जणांपैकी प्रतीक ऊर्फ पिन्या गणेश खडके, रोहित शत्रुघ्न पवार आणि दीपेश ऊर्फ दीप्या संजय सिंग या तिघांच्या मुसक्या आवळल्या. या टोळीतील दोन जण अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. या तिघांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.