

पिशोर / कन्नड (छत्रपती संभाजीनगर) : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गावोगावी दुर्दैवी घटना घडत आहेत. कन्नड पुराच्या पाण्यात ११ वर्षाचा मुलगा आणि एक शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली. यात टाकळी शाहू येथील शेतकरी साहेबराव दत्तू दहिहंडे यांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. तर मुलाचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साधारण ८ वाजता साहेबराव दहीहंडे हे त्यांच्या गट नं. १४१ मधील शेतघरातून गायीचे दूध घेऊन टाकळी बु. गावाकडे निघाले होते. दरम्यान, गावाच्या दक्षिणेकडील मोहरा रस्ता येथील पुलावरून वाहणारे पाणी पार करण्याचा प्रयत्न करताना त्यांचा तोल जाऊन ते वाहून गेले.
अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने त्यांचे नियंत्रण सुटले व ते पाण्याबरोबर खेचले गेले. याबाबतच्या घटनेनंतर ग्रामस्थांनी शोध घेतल्यावर त्यांचा मृतदेह सुमारे २ किलोमीटर अंतरावर केटी बांधावर सापडले. नवयुवकांनी मोठ्या श्रमाने दोर बांधून मृतदेह बाहेर काढला. उत्तरीय तपासणीसाठी नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी पोलिसांनी पंचनामा केला. महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. मयत साहेबराव दहीहंडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, अविवाहित मुलगा व विवाहित मुलगी जावई असा परिवार आहे. पुलांची उंची वाढविण्यासाठी दरवर्षी येथील नागरिक मागणी करतात. मात्र, याकडे प्रशासन कायम दुर्लक्ष करत आहे. अखेर पुलाने एकाचा जीव घेतल्याचा संताप नागरिक व नातेवाईकांनी व्यक्त केला.
कन्नड शहरानजीक असलेल्या शिवना नदीत लंगोटी महादेव येथून ११ वर्षीय मुलगा पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे.
शहरातील शिवना नदीवरील केटी बंधाऱ्यावर मंगळवारी (दि. २३) सकाळी ११ वर्षीय इर्शान शेख खाजा हा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला. दिवसभर शोध घेतला असता तो सापडला नाही. रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली असून, बुधवारी (दि. २४) सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू होणार आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास इर्शान शेख खाजा आपल्या मित्रांसह केटी बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता. केटी बांधाऱ्याच्या भिंतीवरून उडी मारून पोहायला गेला असताना इर्शान हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. स्थानिक नागरिक व नातेवाइकांनी नदीलगत झुडपे, झाडे व गड्यांमध्ये शोधमोहीम राबवली. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी तात्काळ छत्रपती संभाजीनगर आपत्कालीन विभागाशी संपर्क साधून अग्निशामक दल व रेस्क्यू पथकाची मदत मागवली. कन्नड नगर परिषदेतर्फे स्वच्छता निरीक्षक पवन परदेशी, अग्निशामक दलाचे बाजीराव थोरात व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.