

Traffic disrupted for three hours at Ajanta Ghat
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर -जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दापूर येथील अजिंठा घाटात सोमवारी (दि.१) सकाळी अपघातामुळे तब्बल तीन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. घाटातील घोडीपटांगण परिसरातील अत्यंत अरुंद व धोकादायक वळ-णावर बिघाड होऊन उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली.
जालन्याकडून लोखंडी आसारी घेऊन जळगावकडे जाणारा ट्रक (एमएच २० जीजे ४१३९) घाटातील घोडीपटांगण परिसरातील अरुंद वळ-णावर बिघाड झाल्याने उभा होता. त्यामुळे त्या ठिकाणी केवळ एकेरी वाहतूक सुरू होती. दरम्यान, सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा (एमएच ५१ सी ०९९१) अचानक ब्रेक निकामी झाले व अनियंत्रित झालेल्या ट्रकने समोर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही ट्रक घाटातील वळणावरच आडवे अडकून पडले. यामुळे आधी सुरू असलेली एकेरी वाहतूकही बंद पडल्याने संपूर्ण घाटातील वाहतूक ठप्प झाली.
अपघातस्थळी एकावेळी केवळ एक मोटारसायकल जाईल एवढीच जागा शिल्लक राहिली होती. परिणामी जळगाव व छत्रपती संभाजीनगर या दोन्ही दिशांनी येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
वाहतूक कोंडीत अडकलेल्या शेकडो वाहनांमध्ये एसटी बस, पर्यटकांची वाहने, खासगी चारचाकी, मालवाहू ट्रक तसेच विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी वाहने होती. उन्हाच्या तीव्र झळा आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय यामुळे प्रवासी अक्षरशः त्रस्त झाले होते. प्रवास करणाऱ्या नागरिकांना या काळात नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
वाहनांना नाहक फेरा
घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर व बुऱ्हाणपूरकडून येणाऱ्या अनेक एसटी बस व खासगी वाहनांना फर्दापूर येथून तर काहींना चक्क घाटातून माघारी फिरावे लागले. यापैकी काही वाहनांनी सोयगावड हळदा मार्गे तर काहींनी तोंडापूरड्ड धावडा मार्गे तब्बल ३० ते ४० किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारून छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, सोलापूर, नांदेड व शिर्डीकडे प्रवास केला. वाढत्या डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त अंतर कापावे लागल्याने वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.