अजंठा घाटात सलग दुसऱ्या दिवशी बारा तास कोंडी

एका ट्रकला अपघात तर दोन ट्रकमध्ये बिघाड | तीन वेगवेगळ्या घटनांनी परिस्थिती चिघळली
Traffic Police
Traffic Police Pudhari
Published on
Updated on

फर्दपूर : छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दपूर येथील अजंठा घाटात बुधवारी (दि. २२) पहाटेच्या सुमारास ट्रक (एम एच १८ बी जी ६८६२) धोकादायक वळणांवर घाटातील डोंगराच्या कड्याला आदळून अपघाताग्रस्त झाल्याने तर अन्य दोन वेगवेगळ्या वळणांवर दोन ट्रक बिघाड होऊन बंद पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. पहाटे (रात्री) एक वाजल्यापासून सुरू झालेली ही कोंडी तब्बल बारा तास कायम राहिल्याने घाट परिसरात अक्षरश: वाहतूक ठप्प झाली होती.

विशेष म्हणजे, मंगळवारी (दि. २१) याच अजंठा घाटात सुमारे सहा तास वाहतूक कोंडी झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा बारा तासांची कोंडी झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचा संताप अनावर झाला. सलग दोन दिवसांच्या कोंडीमुळे प्रशासनाच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

घाटातील अरुंद रस्ता, तीव्र वळणे आणि जड वाहनांची वाढती वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी झालेल्या अपघातानंतर घाटाच्या पायथ्यापासून थेट माथ्यापर्यंत सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी वाहनचालकांना तासन-तास जागेवरच थांबावे लागले. या कोंडीत पर्यटक, प्रवासी, विद्यार्थी तसेच अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे रुग्णवाहिका चालक अडकून पडले होते. काही रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याचेही समोर आले. उन्हाचा वाढता तडाखा आणि पाण्याची कमतरता यामुळे प्रवाशांची अधिकच गैरसोय झाली.

दरम्यान, अजंठा घाटातील वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली असून, यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांनाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. नाशवंत माल घेऊन जाणाऱ्या वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. घाटात कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. घाटातील धोकादायक वळणांवर सुरक्षा भिंतीचे मजबुतीकरण, वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी पोलीस चौकी, तसेच जड वाहनांवर वेळेचे निर्बंध घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने घटनेस्थळी धाव घेत अपघाताग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम हाती घेतले. त्यानंतर घाटातील अरुंद मार्गावरून टप्प्याटप्प्याने एकेरी वाहतूक सोडून हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे अजंठा घाटातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे.

घाटातील अरुंद वळणे, जड वाहनांची वाढती संख्या आणि वारंवार होणारे अपघात यामुळे प्रत्येक वेळी पोलीस यंत्रणेला तातडीने घटनास्थळी धाव घ्यावी लागते. अपुरी मनुष्यबळ व मर्यादित साधनसामग्रीत ही जबाबदारी पार पाडताना पोलिसांची अक्षरश: दमछाक होत आहे. सलग तासनतास कोंडी सोडविण्याचे काम सुरू असल्याने पोलिसांच्या नियमित कामकाजावरही परिणाम होत असून, इतर कायदा-सुव्यवस्थेच्या कामांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिवस-रात्र अशा तणावपूर्ण परिस्थितीत काम करावे लागत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये थकवा वाढत असून, दीर्घकालीन उपाययोजना तातडीने न झाल्यास हा ताण आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

छोटी वाहने व एसटी बसचा सोयगाव हळदा, शेंदूर्णी मार्गे प्रवास अजंठा घाटात घाट पायथ्यापासून घाट माथ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहनकोंडीत अडकलेल्या वाहनांना संपूर्ण ५ कि.मी.चा घाट पार करण्यासाठी तब्बल दोन तासांचा वेळ लागत होता. या बाबीस कंटाळून अनेक छोट्या चारचाकी वाहनांनी व एसटी महामंडळाच्या बसने फर्दपूरहून सोयगाव हळदा मार्गाने छत्रपती संभाजीनगरकडे तर छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या वाहनांनी गोळेगाव, उंडणगाव हळदा, सोयगाव, शेंदूर्णी मार्गे जळगावकडे प्रयाण केल्याचे दिसून आले.

२४ तास पोलिस यंत्रणेवर वाढता ताण अजंठा घाटातील वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. मंगळवारी (दि. २१) तब्बल सहा तास कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना घाटात सतत तैनात राहावे लागले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच बुधवारी (दि. २२) पहाटे पुन्हा १२ तासांच्या कोंडीने डोके वर काढल्याने पोलिसांना सलग दुसऱ्या दिवशीही घाटातील रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

कोंडीमुळे पेपर हुकला "माझ्या मुलीचा एमएचा पेपर सकाळी दहा वाजता होता; मात्र कोंडीमुळे आम्हाला जवळपास तासभर पुढे जाता आले नाही. शेवटी अजंठा-पिंपळदरी-हळदा मार्गे वळसा घेत अतिरिक्त २५-३० किमी प्रवास करून कसाबसा वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचलो. सुदैवाने मुलगी पेपर देऊ शकली, पण तिची मैत्रीण कोंडीमुळे वंचित राहिली. अशा कोंडीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे."

- अण्णा पोळ (पालक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news