

Thunderstorms and heavy rains in the city and surrounding areas
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर व परिसरात विजांच्या कडकडाटात ढगांच्या गडगडाटात परतीच्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.२०) दुपारी दोन वाजेच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तास तुफान बरसलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या धुवाधार पावसामुळे अनेक भागांतील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर शिवाजीनगर भुयारी मार्ग तुंबल्याने शालेय विद्यार्थ्यांसह कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारंबळ उडाली.
शहर व परिसरात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून शुक्रवारी सायंकाळी मेघगर्जनांसह विजेच्या कडकडाटात धो धो कोसळ लेल्या पावसाने शहराची दणादाण उडवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळपासूनच कडक उन्हामुळे उकाड्यात चांगलीच वाढ झाली. मात्र दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक धो धो पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या.
त्यानंतर मात्र पावसाने चांगलाच जोर धरला. सुमारे दीडतास जोरदार पाऊस पडल्याने रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पाणी वाट मिळेल तिकडे वाहण्यास सुरुवात झाली. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांची धावपळ उडाली. तसेच शहरातील नाले दुथडी भरून वाहू लागले.
तर देवळाई भागात रोडचे काम सुरू असल्याने खादलेल्या खड्यामुळे या भागातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहने बंद पडली होती. तसेच शिवाजीनगर भुयारी मार्ग तुंबल्याने सातारा, देवळाईकडून शहरात येणाऱ्या शालेय विद्यार्थी आणि चाकरमान्यांची दैना झाली. दरम्यान या पावसाने गारवा निर्माण झाल्याने वातावरण अल्हाददायक बनले होते. त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले तर काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
सातारा परिसरातील मुख्य गावठाण, उडाणपूल, बीडबायपासवरील उडाणपुलाखालील, एमआयटी परिसर कैलासनगर, मोंढा, मारुती मंदिर परिसरातील सखल भाग, औषधी भवन, गोमटेश मार्केट, औरंगपुरा भाजीबाजार परिसर. पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम जिथे जिथे सुरू आहेत तिथे पैठणरोड, गोलवाडी, इटखेडा, कांचनवाडी, या रस्त्यावरील पादचारी परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते.