

Municipal Corporation accelerates drainage connection in Satara, Devlai
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेकडून सातारा-देवळाई परिसरातील ड्रेनेज प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले आहे. याअंतर्गत ड्रेनेजलाईन मुख्य ड्रेनेजलाईनला जोडण्यात येत अल्यामुळे घरोघरी ड्रेनेज जोडणीचे काम हाती घेण्यात आले असून एका भांड्यासाठी दोन हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. नोंदणी करताना मालमत्ताधारकांचा अर्ज भरून देत झोन कार्यालयात रक्कम भरण्यासाठी पाठवले जात आहे. रोख अथवा धनादेश स्वरुपात रक्कम स्विकारण्यात येत आहे. मालमत्ताधारकांने रक्कम भरण्यास टाळाटाळ केली तर मालमत्ता कराच्या रकमेत या रकमेची नोंद केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सातारा-देवळाईचा समावेश महापालिकेत झाल्यानंतर मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी आली आहे. महापालिकेकडून अद्यापही या भागात कोणत्याही मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. तरीदेखील सात वर्षांपासून या भागातील नागरिक मालमत्ता कराचा भरणा करीत आहे. त्यामुळे मनपाने केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून सातारा-दे-वळाईसाठी २७५ कोटी रुपयांचा ड्रेनेज प्रकल्प राबविण्यात येत आहे. ड्रेनेज प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर गुजरातमधील अंकीता इन्फ्रास्ट्रक्चर कंत्राटदार कंपनीकडून कामाला सुरुवात झाली.
दोन वर्षांमध्ये मुख्य ड्रेनेजलाईनसह अंतर्गत लाईन टाकण्यात आल्या असून जागोजागी चेंबर बांधण्यात आले आहे. या चेंबरला अंतर्गत लाईन जोडण्यात आल्या आहेत. केंद्राच्या अमृत-२ योजनेतून राबविण्यात येत असलेल्या सातारा-देवळाई ड्रेनेज प्रकल्पासाठी मनपाला स्वहिस्सा म्हणून ३० टक्के म्हणजे साधारणपणे ८२ कोटी रुपये भरावे लागणार आहे. ही रक्कम उभारण्यासाठी मनपाने प्रत्येक भांड्यासाठी २ हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मालमत्ताधारकांकडून त्यांच्या घरात असलेल्या ड्रेनेजच्या भांड्याप्रमाणे रक्कम वसूल केली जाणार आहे.
तसेच ड्रेनेज प्रकल्पाचा डीपीआर तयार करणाऱ्या पीएमसी आणि मनपाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. हे कर्मचारी प्रत्येक मालमत्ताधारकाकडे जाऊन ड्रेनेज चेंबरला जोडणी करून देत आहे. सोबतच मालमत्त- ाधारकांकडून अर्ज भरून घेतला जात आहे. हा अर्ज भरून झोन कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात येत आहे. मालमत्ताध- ारकाला एका भांड्यासाठी दोन हजार रुपये या प्रमाणे रक्कम भरण्यास सांगितले जात आहे. घरातील एकूण भांड्यांची संख्या आणि रक्कम एकत्रितपणे अर्जावर नमूद केली जाते. झोन कार्यालयात मालमत्ताध- ारकांने पैसे भरण्याची तयारी दर्शविल्यास त्याच्याकडून पैसे भरून घेतले जातात. पैसे भरण्याची तयारी नसेल तर ड्रेनेजची ही रक्कम मालमत्ता करामध्ये जमा करून वसूल केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेने सातारा-देवळाईच्या ड्रेनेज प्रकल्पाची नोंदणी करण्यासाठी ३५ हजार मालमत्ताधारकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ५ हजार मालमत्ताधारकांच्या ड्रेनेजची चेंबरला जोडणी करण्यात आले आहे. त्यापैकी साडेतीन हजार मालमत्ताधारकांनी अर्ज भरून घेतले आहे. या रकमेतूनच मनपाचा हिस्सा भरावा लागणार आहे. त्यामुळे गतीने जोडणीचे काम हाती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.