

Three Drown in Tembhapuri Dam
वाळूज, पुढारी वृत्तसेवा : वाळूजलगतच्या टेंभापुरी मध्यम प्रकल्प परिसरात अवैध मुरूम उत्खननामुळे तयार झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना कामगार दिनाच्या सुटीदिवशी, शुक्रवारी (दि. १) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या धरणात आणि परिसरातील खड्ड्यांत बुडून वर्षभरात तब्बल नऊ जणांचा बळी गेला असून, प्रशासनाच्या सुस्त कारभारावर आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शैलेश संतोष जोगदंड (रा. परभणी), शैलेश दीपक हेळसकर आणि आविष्कार पंजाब लोखंडे (दोघे रा. नांदेड, सर्व हल्ली मुक्काम दत्तनगर व त्रब्रीकेशनगर, रांजणगाव शेणपुंजी) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे तिघेही २५ ते ३० वयोगटातील होते.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना शुक्रवारी सुटी असल्याने एकूण ९ तरुण टेंभापुरी प्रकल्प परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यातील काही तरुण पाण्यात उतरले असता, मुरूम माफियांनी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांचा त्यांना अंदाज आला नाही. पाण्याच्या खोलीमुळे तिघे जण बुडू लागले. सोबतच्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आले.
घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे, उपनिरीक्षक अजय शितोळे आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने शोधमोहीम राबवून तिघांना पाण्याबाहेर काढले व घाटी रुग्णालयात हलवले. मात्र, तपासून डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. उर्वरित सहा तरुण सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वाळूज पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
वर्षभरात नऊ जणांचा बळी
टेंभापुरी धरण आणि परिसरातील गायरान जमिनीत अवैध उत्खननामुळे मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. दसऱ्याच्या दिवशी ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या लिंबेजळगावच्या तीन तरुणांचा याच खड्डयांत बुडून मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यात २६ मार्च रोजी छावणी भागातील प्रिन्स आशेर श्रीसुंदर या तरुणाचाही येथेच बुडून मृत्यू झाला. वर्षभरात ९ बळी गेल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.